औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या नांदेड-औरंगाबाद-नांदेड विशेष रेल्वेला मंगळवारी (दि. ३) पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.
औरंगाबाद-नांदेड विशेष रेल्वेची ४६२ प्रवासी तिकीट विक्री झाली. त्यातून ४० हजार रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले, तर २०० पासधारकांनी रेल्वेतून प्रवास केला. सायंकाळी ५ वाजता रेल्वेचे लोकोपायलट महेश वर्मा, सहायक अमरीशकुमार पटेल, गार्ड कुवर पाल यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वेस्टेशन व्यवस्थापक एल. के जाखडे, मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर, रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा, सुनील महाजन आदींनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
३० सप्टेंबरपर्यंत रविवारवगळता आठवड्यातून सहा दिवस नांदेड-औरंगाबाद-नांदेड ही विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. ही रेल्वे नांदेड येथून सकाळी ८ वाजता सुटेल. या रेल्वेला पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, रांजणी, जालना, बदनापूर, मुकुं दवाडी येथे थांबे आहेत. ही रेल्वे औरंगाबाद येथे दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे औरंगाबाद येथून सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री १० वाजता पोहोचेल.