औरंगाबाद : हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी सकाळच्या वेळेत चालविण्यात येणाऱ्या दिल्ली- औरंगाबाद विमानाला रविवारी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातून नव्या विमानसेवेची किती गरज आहे, हे स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
औरंगाबादहून जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान मार्चपासून बंद झाले. त्यामुळे पर्यटन, उद्योगासह विविध क्षेत्रांवर परिणाम होत असल्याने नव्या विमानसेवेची अवघ्या शहरवासीयांना प्रतीक्षा लागली आहे. जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून चिकलठाणा विमानतळावरून सकाळच्या वेळेत विमान नाही; परंतु हज यात्रेच्या निमित्ताने विमानतळ सकाळच्या सत्रात गजबजत आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २७ जुलैपर्यंत हज यात्रेकरू औरंगाबादहून थेट जेद्दाहला रवाना होणार आहेत. हज यात्रेसाठी दिल्लीहून औरंगाबादला येणाऱ्या विमानातून यंदा प्रवासी वाहतूक केली जात आहे.
अवघ्या ७ दिवसांसाठी उड्डाण घेणाऱ्या सकाळच्या वेळेतील दिल्ली- औरंगाबाद विमानातून पहिल्याच दिवशी रविवारी दिल्लीहून ७२ प्रवासी औरंगाबादला दाखल झाले, तर दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे सोमवारी दिल्लीहून येणाऱ्या विमानाची बुकिंग शंभरावर असल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. केवळ सात दिवसांसाठी का होईना, प्रवाशांना दिल्ली- औरंगाबाद विमानसेवा यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे.
जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे सकाळच्या वेळेत औरंगाबादला मुंबई आणि दिल्ली हवाई क नेक्टिव्हिटी मिळत होती; परंतु आता ही कनेक्टिव्हिटी केवळ एअर इंडियाच्या माध्यमातूनच सुरू आहे. तीदेखील सायंकाळी. त्यामुळे दिल्लीहून औरंगाबाद- मुंबईला ये-जा करणाऱ्यांना अर्ध्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. सकाळच्या वेळेत मुंबई, दिल्लीसह अन्य शहरांसाठी विमान सुरू झाले, तर पर्यटन, उद्योग क्षेत्रासह प्रवाशांची मोठी सुविधा होईल. त्यामुळे नव्या विमानसेवेकडे लक्ष लागले आहे.
स्पाईस जेट, ‘इंडिगो’च्या वेळापत्रकाची प्रतीक्षाचिकलठाणा विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्यास विमान कंपन्यांचा प्रतिसाद मिळत असून, लवकरच विमानसेवा सुरूहोण्याची आशा निर्माण झाली आहे. स्पाईस जेट, इंडिगो या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर पाहणी केली आहे. आॅगस्टपासून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वेळापत्रक कधी जाहीर होते, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.
सकाळी विमान गरजेचेसकाळच्या वेळेत विमानाची मागणी आहे. पर्यटनाचा विचार करता तशी गरजदेखील आहे. सात दिवसांसाठी येणाऱ्या विमानाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे दिसून येत आहे, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत म्हणाले.