औरंगाबाद : ‘हम अपना अधिकार मांगते, नही किसीसे भिक मांगते’, या आणि अशा घोषणा देत, डफ वाजवत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) गुरुवारी हल्लाबोल मोर्चा काढला. मागण्यांसंदर्भात कुलगुरूंना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी केली.
कमवा व शिका योजनेचे मानधन ४ हजार रुपये करण्यात यावे. विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी अद्ययावत अवजारे द्यावीत. पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची दरवर्षी १० टक्के शुल्कवाढ थांबवा. विद्यार्थ्यांसाठी १ हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधा. मुलींच्या वसतिगृहातील सॅनिटरी व्हेंडिंग मशीन्स सुरू करा. वसतिगृहांमध्ये माफक दरात भोजनालय सुरू करा. विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयात संदर्भग्रंथ, नेट, सेट व स्पर्धा परीक्षा संदर्भातील नवीन आवृत्तीची पुस्तके उपलब्ध करून द्या. प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरा. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठ परिसरामध्ये तात्काळ मोफत इलेक्ट्रिकल बस सेवा सुरू करा. परीक्षा भवनाच्या खिडक्यांवर फॅकल्टी व खिडकी क्रमांकाचे फलक लावण्यात यावे. मुलींच्या वसतिगृहातील नव्यानेच उद्घाटन झालेले संगणक कक्ष तात्काळ सुरू करा. वसतिगृहासमोर खुल्या व्यायामशाळा सुरू करा. पूर्वीप्रमाणे प्रत्येक विभागाला शैक्षणिक सहलीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. प्रशासकीय इमारतीसमोरील एटीएम व प्रिंटर मशीन्स सुरू करा. वर्धापनदिनी ओपन डे पूर्ववत सुरू करा. वसतिगृहात स्वतंत्र अशी मासिके, दैनिक वृत्तपत्रे सुरू करण्यात यावी. वैद्यकीय सुविधा सक्षम करून तिथे नवीन महिला डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी. वसतिगृहात खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
वाय काॅर्नर ते प्रशासकीय इमारतीपर्यंत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यजित म्हस्के, अशोक शेरकर, अनुजा सावरकर, मनीषा बल्लाळ, विश्वजीत काळे, दिनेश भावले, अरुण मते, राजेश डोंगरदिवे, प्रतीक शिंदे आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोर्चात सहभागी झाले होते.