औरंगाबाद : वीस वर्षांपूर्वी शहरातील जालना रोडला मृत्यूचा सापळा म्हटले जायचे. आता पडेगाव रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षभरात दहा ते बारा लोकांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा दुपटीने जखमी झाले. या अरुंद रस्त्यावर माणसांचे मृत्यू होत असताना बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्वजण गप्पच आहेत.
अहमदनगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी मागील वीस वर्षांपासून होत आहे. या वीस वर्षांच्या काळात पडेगाव परिसरात वसाहती वाढल्या. शाळा, हॉटेल आणि इतर व्यवसायही वाढले. रस्त्यावरील वाहनांची संख्याही वीस वर्षांत दहा पटीने अधिक झाली. मात्र, हा रस्ता रुंद न झाल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
गेल्या तीन वर्षांत नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट या दरम्यानच्या रस्त्यावर सुमारे ७० बळी गेले आहेत. यामधील बहुतांश बळी हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, महापालिका आणि लोकप्रतिनिधी सारेच गप्प असल्याने या मृत्यूच्या सापळ्यातून नागरिकांची सुटका होणार नाही, असेच चित्र आहे.
२०१४ साली या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, या विषयाकडे बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्षच केले, तर हा विषय राजकीय नेत्यांच्या चर्चेतही येत नाही, इतके त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेलची संख्या वाढल्याने रस्त्यावर उभ्या राहणार्या वाहनांची संख्या अधिक आहे. वाहतूक पोलीस ही वाहने हटविताना दिसत नाही.
पर्यायी रस्त्यांची कामे कधी?नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतच्या रस्त्याला पर्यायी असे दोन रस्ते विकास आराखड्यात आहेत. एका रस्त्याचे ९० टक्के भूसंपादन झालेले आहे. भूसंपादन झालेल्या रस्त्यावर मनपाने कच्चा रस्ता जरी तयार केला तरी निम्मी वाहतूक त्या रस्त्यावर वळेल. वैजापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाणार्या या रस्त्यांची कामे लवकरात लवकर झाल्यास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होऊन अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.