श्रीक्षेत्र माहूर : शहरातील रामगड किल्ल्यात खोदकाम करत असताना हत्ती दरवाजासमोरील रस्त्याच्या कडेला मानवी सांगाडा आढळून आला. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता घडली. याप्र्रकरणी माहूर पोलिसांत सांगाडा सापडल्याची नोंद केली असून गुन्ह्याची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.शासनाच्या वतीने रामगड किल्याच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत सुरु आहे. दरम्यान , किल्ल्यावरुन रस्त्यावर घसरुन पडलेली माती टिकास, फावड्याद्वारे बाजूला करत असताना मजुराच्या फावड्यात नाथानी कलेक्शन नावाची कॅरिबॅग सापडली. आणखी खोदकाम केले असता मानवी कवटी, हाडे आढळून आली. मजुरांनी लगेच कंत्राटदाराच्या मुनीमाला ही माहिती दिली. मुनिमाने पुरतत्व विभागाचे वॉचमन झेड.सी. गौतम यांना फिर्याद देण्यासाठी ठाण्यात पाठविले. परंतु वृत्त लिहिपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया, उपविभागीय पोलिस अधिकारी एस. व्ही. चौधरी यांना कळवून घटनास्थळी भेट घेतली. घटनेचा पंचनामा करताना प्रभाकर करडेवाड, पी. एम. गेडाम, बंडू जाधव, पी. एम. भिसे, सत्यपाल मडावी, धनंजय बदेवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, माहूरच्या रामगड किल्ल्यात यापूर्वीही मानवी सांगाडे सापडण्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यामुळे किल्ला परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ (वार्ताहर)
रामगड किल्ल्यात सापडला मानवी सांगाडा
By admin | Published: February 26, 2016 11:50 PM