औरंगाबाद : शहरातील गोरगरीब नागरिकांनाही दिवाळी आनंदाने साजरी करता यावी या उद्देशाने महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी १२ ठिकाणी माणुसकीची भिंत उभी करण्याचा निर्णय घेतला.
''नको असलेले द्या, हवे असलेले घेऊन जा'' या संकल्पनेवर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाण्डेय यांनी केले. मनपाने ''माणुसकीची भिंत'' या माध्यमातून नागरिकांना घरी अडगळीत पडलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. मनपाने ९ झोन कार्यालयांच्या १२ ठिकाणांवर माणुसकीची भिंत उभारली आहे.
-----
या ठिकाणी देता येणार वस्तू
टाऊन हॉल परिसरातील महानगरपालिका मुख्यालय परिसर, खोकडपुरा येथील उदय झेरॉक्सजवळ, शहागंज चमन परिसर, रोशन गेट, एन -११ मधील भाजी मार्केट, एसबीओए शाळेसमोरील गणपती मंदिर, मयूर पार्क, एन -१ येथील काळा गणपती मंदिर, एन -२ कम्युनिटी सेंटर, कामगार चौक, गारखेडा येथील रिलायन्स मॉल, शाहनूरवाडी येथे डी-मार्ट, उस्मानपुरा येथील कामगार चौकातील पीर बाजार आणि क्रांती चौकातील गोपाळ टी-सर्कल येथे माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. घरातील न वापरण्यात येणारे कपडे, बूट, खेळणी, पुस्तके, फर्निचर अशा वस्तू नागरिक या ठिकाणी देऊ शकतात. गरजवंत स्वतः तेथे येऊन जी वस्तू हवी असेल ती घेऊन जाऊ शकतील, असे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी सांगितले.