छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यापूर्वी शहरात १०० कोटींची कामे सुरू होतील, अशी घोषणा मनपा प्रशासनाकडून करण्यात आली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कामे सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कंत्राटदारांना देण्यात येणाऱ्या वर्क ऑर्डरच्या फाइलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही झाली नाही. यामुळे अजून महिनाभर तरी नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
शहरातील प्रमुख रस्ते महापालिका निधीतून गुळगुळीत करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. हे रस्ते कोणते? माझ्या विधानसभा मतदारसंघातील रस्ते किती? असा राजकीय गोंधळ सुरुवातीला होता. अनेक आघाड्यांचा मुकाबला करीत दोन महिन्यांपूर्वी ६३ रस्त्यांच्या चार निविदा प्रसिद्ध केल्या. तीन निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. चौथी निविदा पुन्हा प्रसिद्ध करावी लागली. त्यासाठीही कंत्राटदार सरसावले. कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना प्रशासकांची बदली झाली. नवीन प्रशासक जी. श्रीकांत यांनी पदभार स्विकारला.
कंत्राटदार एजन्सीची नावे निश्चित करून प्रशासनाने संबंधित एजन्सींना बँक गॅरंटी भरण्याबद्दल सूचना केली. एजन्सीने बँक गॅरंटी भरली त्या एजन्सीला वर्कऑर्डर देण्याची तयारीदेखील सुरू करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्कऑर्डरची फाइल वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. त्यांची सही झाल्यास वर्क ऑर्डर देण्यात येईल. मात्र, अधिकारीही सहीची प्रतीक्षा करीत आहेत.
शंभर कोटींत चार टप्पेशंभर कोटींची एकच निविदा न काढता २५-२५ कोटींचे चार टप्पे करून या निविदा काढण्यात आल्या. चार टप्प्यांत निविदा काढल्यास सर्वच रस्त्यांची कामे गतीने होतील, कामांचा दर्जा चांगला असेल, असे गणित मांडण्यात आले होते. चार टप्प्यांपैकी तीन टप्प्यांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला. एका टप्प्याच्या कामासाठी प्रतिसाद न मिळाल्यामुळे या टप्प्यासाठी फेरनिविदा काढण्यात आली होती.