वाळूज महानगर : शासनाकडून गोर-गरिबांना भूखंड वाटप केले जाणार असल्याची अफवा पसरल्यामुळे करोडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमणे करण्याचा धडाका सुरुच आहे.
या अतिक्रमणधारकांनी ट्रॉन्सपोर्ट हबच्या जागेसोबत आरटीओ समोरील जागेवरही कब्जा केला असून, जागा पकडण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे साजापूर-करोडीवासियात नाराजीचा सूर उमटत आहे.साजापूर-करोडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जवळपास ३५० एकर सरकारी जमीन आहे.
राज्य शासनाकडून यापैकी गट नंबर २४ मध्ये प्रादेशिक परिवहन महामंडळ, महात्मा फुले शिक्षण संस्था, महावितरण, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व रस्ते विकास महामंडळ आदी विभागांना जमिनीचे वाटप केले आहे. तर गट क्रमांक १३५ मध्ये क्रीडा विद्यापीठ, भारत सरकार एन.एच.-५२ आदींना जमिनी देण्यात आली आहे. करोडी शिवारातील गट क्रमांक २४ मधील २४ हेक्टर जमीन वाहनतळ व ट्रॉन्सपोर्ट हबसाठी रस्ते विकास महामंडळाला दिलेली आहे. या ठिकाणी ७५ कोटी रुपयाचा निधी खर्च करुन अद्यावत असे ट्रॉन्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे.
या ट्रॉन्सपोर्ट हबमध्ये वाहनधारकांना गॅरेज, आॅटो मोबाईल्सची दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप इत्यादी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे रस्ते विकास महामंडळाला या २४ हेक्टर जागेचा ताबाही देण्यात आलेला आहे.
मात्र, या ट्रॉन्सपोर्ट हबच्या जागेवर तीन दिवसांपासून अनेकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सुधाकर बाविस्कर यांनी यासंदर्भात दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.