औरंगाबाद : जानेवारी महिन्यात नवीन वर्ष, मकरसंक्रांत व प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी खरेदीवर आकर्षक सूट, बक्षीस व क्रेडिट कार्डवर कॅशबॅकच्या ऑफर दिल्या होत्या. या ऑफरचा फायदा घेत सायबर भामट्यांनी शेकडो जणांना चुना लावला. त्यातील तात्काळ तक्रार दाखल करणाऱ्यांचे १० लाख ८० हजार रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिल्याची माहिती निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनेक जणांना ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातील अकरा तक्रारदात्यांच्या क्रेडिट कार्डची व बँकेची संपूर्ण माहिती घेऊन निरीक्षक प्रविणा यादव, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, सविता तांबे, अंमलदार जयश्री फुके, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, शाम गायकवाड, राम काकडे, अभिलाष चौधरी यांनी परिश्रम घेत तक्रारकर्त्यांचे १० लाख ८० हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.
नागरिकांनी अनोखळी फोन कॉल्स, मॅसेज, लिंकवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, कोणतीही बँक अशा प्रकाराची माहिती विचारत नाही. गुगल प्ले स्टोअर व इतर ऑनलाइन माध्यमातून मिळणाऱ्या ॲपचा वापर करून घेताना काळजी घ्यावी, ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ जवळील पोलिस ठाणे किवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी केले.