औरंगाबाद : घाटी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णसंख्येने रविवारी (दि.२१) पुन्हा शंभरी गाठली. अवघ्या २० दिवसांतच येथील रुग्णांत दुपटीने वाढ झाली. ही संख्या अशीच वाढत गेली तर घाटी प्रशासनाला पुन्हा एकदा उपचारासाठी कसरत करावी लागणार आहे.
घाटीत २४ सप्टेंबर २०२० रोजी कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक ३५३ रुग्ण दाखल होते. यात गंभीर रुग्णांची संख्या ही तब्बल २३० होती. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे केवळ सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीतच रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यात आले.
घाटीत १ फेब्रुवारी रोजी कोरोनाचे केवळ ४१ रूग्ण दाखल होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या आलेखाने ही संख्या रविवारी शंभर झाली. या शंभर रुग्णांत ५६ रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. मात्र, ४४ रुग्णांची प्रकृती मात्र गंभीर असल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.
घाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात. येथील रुग्णांची संख्या वाढणे म्हणजे गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याचे संकेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने काही दिवसांपूर्वीच कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी कमी करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मनुष्यबळ अपुरे पडण्याची भीती आहे.
१५५ कर्मचाऱ्यांची गरज
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी विविध १५५ कर्मचाऱ्यांची घाटीला आवश्यकता आहे. या मनुष्यबळासह त्यांच्या पुढील तीन महिन्यांच्या वेतनासाठी ९० लाख ७१ हजार ३७६ रुपयांच्या निधीची मागणी घाटी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.