औरंगाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवारी शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. ठाकरे यांनी वारंवार शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त होतील, असा विश्वास असून ठाकरे तो शब्द पाळतील, असे वाटते आहे.
शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी व काही कार्यकर्त्यांनी देखील बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, येणाऱ्या सरकारकडून त्यांनाही अपेक्षा आहेत. शिवाय ठाकरे कुटुंबियातून पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद भूषविले जाणार आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले, शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता येईल, यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येईल. सिल्लोड, पैठण, फुलंब्रीतील शेतकऱ्यांनी स्वत:हून मुंबईला शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तयारी केली. उत्स्फूर्तपणे ते मुंबईला जाण्यासाठी निघाले.
आ. भुमरे, आ. सत्तार यांचे नाव चर्चेत जिल्ह्यात शिवसेनेचे सात आमदार आहेत. त्यापैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पैठणचे आ.संदीपान भुमरे यांचे नाव मंत्रिमंडळात वर्णी लागण्याबाबत आघाडीवर आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आ.अब्दुल सत्तार हे लॉबिंग करीत आहेत. इतर कुणाचेही नाव मंत्रिमंडळासाठी चर्चेत नाही. शपथविधी सोहळ्यात महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे दोन आमदार शपथ घेणार आहेत. ३ डिसेंबरनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतरच आघाडीतील सर्व घटक पक्षांतील मंत्र्यांची नावे समोर येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पालकमंत्री मुंबईचाच असणार?औरंगाबादला पालकमंत्री मुंबईतूनच नेमण्यात येईल. ठाकरे यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर पालकमंत्री नेमण्याबाबत आघाडीची संयुक्त बैठक होऊन निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. मागील पाच वर्षांत जिल्ह्याला जे पालकमंत्री मिळाले, ते सर्व मुंबईचेच होते. रामदास कदम, डॉ. दीपक सावंत आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही पालकमंत्री मुंबईचेच होते. यावेळीदेखील पालकमंत्री मुंबईचाच असेल, असे बोलले जात आहे.
औरंगाबाद सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक शपथविधीला रवानाउद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमाला औरंगाबाद शहरातील तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महापालिकेतील पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मुंबईला बुधवारी रात्रीच रवाना झाले. अनेक जण गुरुवारी सकाळी मुंबईकडे निघणार आहेत.मागील एक महिन्यापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोट बांधली. मुख्यमंत्री म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा आयोजित केला आहे. औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अनेक जण बुधवारी सायंकाळी रवाना झाले. काही जण उद्या सकाळी वाहनाने निघणार आहेत. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले होते. २००० पर्यंत हे सरकार होते. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड आनंदी आहेत. शपथविधी सोहळ्याला न जाणारे कार्यकर्ते शहरातच थांबून जल्लोष साजरा करणार आहेत. जल्लोषात काँग्रेस-राष्टÑवादीचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.