औरंगाबाद : तुटपुंज्या अनुदानामुळे जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत शेततळ्याचे काम करून घेण्यास शेतकरी उदासीन दिसत आहेत. कृषी विभागाने जिल्ह्यातील अठराशे शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश दिले. परंतु त्यापैकी आतापर्यंत केवळ ७१ जणांनीच कामाला सुरुवात केली आहे. तर तीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी मंजूर शेततळे नाकारले आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा ‘मागेल त्याला शेततळे’ ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात तब्बल ११ हजार शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी अर्ज केले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी शासनाने २४१७ शेततळ्यांचेच उद्दिष्ट दिलेले आहे. त्यामुळे या अकरा हजारांमधून २४१७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर लगेचच सुमारे अठराशे जणांना कार्यारंभ आदेश दिले. महिनाभरात शेततळ्यांचे काम पूर्ण करावे, असे अपेक्षित आहे. मात्र, या योजनेंतर्गत शेततळ्यांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांपर्यंतचेच अनुदान देय आहे. शेततळ्यासाठी दीड ते दोन लाखांचा खर्च येत असताना इतके कमी अनुदान मिळत असल्यामुळे शेतकरी या योजनेतून शेततळे घेण्यास उदासीनता दाखवीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कार्यारंभ आदेश दिलेल्या अठराशेपैकी अवघ्या ७१ जणांनी कामाला सुरुवात केली आहे. बहुतेक शेतकरी अपुऱ्या अनुदानामुळे शेततळे घेण्याविषयी संभ्रमावस्थेत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी शासनाचे हे शेततळे नाकारले आहे. इतक्या कमी अनुदानात शेततळे तयार करणे शक्य नसल्यामुळे ते घेणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी लेखी दिले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे तीनशेहून अधिक जणांनी शेततळे नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेकडो शेतकऱ्यांनी नाकारले शेततळे
By admin | Published: May 12, 2016 12:02 AM