वाळूज महानगर : कामगार कल्याण मंडळाची वेबसाइट सतत हँग होत असल्यामुळे वाळूज उद्योगनगरीतील शेकडो कामगार पाल्य शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी कामगारातून केली जात आहे.
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांना मंडळाकडून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. यंदा या शिष्यवृत्तीसाठी कामगार पाल्यांचे ऑफलाइन अर्ज न घेता मंडळाच्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या सुचना मंडळाने केल्या आहेत. गत महिनभरापासून ऑनलाइनप्रणालीद्वारे शिष्यवृत्तीचे अर्ज कामगार पाल्य दाखल करीत आहे. मात्र मंडळाची वेबसाइट सतत हँग होत आहे. त्यामुळे पाल्यांना तासन-तास अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या
मंडळाची वेबसाइट सतत हँग होत असल्याने पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची मागणी कामगार पाल्यातून केली जात आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि.१५) असल्याने बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, सिडको वाळूजमहानगर, तीसगाव, वळदगाव आदी भागांतील शेकडो कामगाराचे पाल्य शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती प्रकाश जाधव, लक्ष्मण लांडे आदी कामगारांनी व्यक्त केली आहे. याविषयी बजाजनगरातील कामगार कल्याण भवनचे निरीक्षक दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेबसाइट हँग होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत आल्याने वेबसाइटवर लोड वाढल्याने वेबसाइट हँग होत असल्याचे सांगितले.
---------------------