छत्रपती संभाजीनगर : पाणीटंचाईमुळे सारे त्रस्त असताना शहरातून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यावर मात्र वाळूज परिसरातील शेती चांगलीच बहरल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून मंगळवारी दिसून आले.
दुरूनच दुर्गंधी येणाऱ्या या पाण्यात विद्युत मोटारपंपाद्वारे पाण्याचा उपसा करून फळबाग, ऊस आणि गुरांसाठी गवत पिकविले जात आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत आटले आहेत. तीव्र पाणीटंचाईचा सामना सुरू असताना शहरालगतच्या काही गावांत मात्र ड्रेनेजच्या पाण्यावर जोरदार शेती सुरू असल्याचे मंगळवारी लोकमत प्रतिनिधींना दिसून आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वांत मोठ्या नाल्यातून ड्रेनेजचे पाणी वाहत वाळूज, वळदगाव मार्गे पुढे वाहत जाते. या नाल्यातून वाहणाऱ्या घाणेरड्या पाण्याची दुर्गंधी सुमारे अर्धा किलोमीटर परिसरात पसरलेली असते. अशा नाल्याच्या दोन्ही काठावर शेती असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नाल्यामध्ये शेकडो विद्युत मोटार पंप टाकले आहेत.
या पंपाद्वारे नाल्यातील पाणी उपसा करून ते शेतातील पिकांना देण्यात येते. विशेष म्हणजे हा नाला रात्रंदिवस वाहतो. यामुळे पाण्याचा तुटवडा कधीही भासत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जास्त पाणी लागणाऱ्या उसाची शेती या पाण्यावर सुरू केली आहे. वळदगाव, धामोरी वाळूज परिसरातील नाल्याकाठचे शेतकरी नाल्याच्या पाण्यावर शेती करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा लावल्या आहेत, तर काही जण भाजीपाला पिकवितात. शिवाय जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून गवत शेतीही मुबलक प्रमाणात दिसून आली. हे गवत शहरातील पशुखाद्य म्हणून विकून बक्कळ कमाई हे शेतकरी करतात.
सुखना नदीतील चेम्बरमध्ये विद्युत मोटारपंपशहराच्या पूर्वेला वाहणाऱ्या सुखना नदीत खूप मोठी ड्रेनेजलाइन आहे. बंद ड्रेनेजलाइनच्या पाइपमध्ये चोकअप हाेऊ नये, तसेच नवीन जोडणी देण्यासाठी ठिकठिकाणी महाकाय चेम्बर आहेत. या चेम्बर्समध्ये सुखनाकाठच्या शेतकऱ्यांनी मोटारपंप टाकून चेम्बरमधील घाणरेड्या पाण्याचा उपसा करून शेतासाठी वापर केला जात आहे.
पाच वर्षांपूर्वी झाली होती मोठी दुर्घटनाचेम्बरमधील मोटार पंप काढताना चार शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना चार वर्षांपूर्वी घडली. तेव्हा ड्रेनेज चेम्बरमध्ये मोटार पंप बंद करण्याचे निर्देश पोलिस विभागाने शेतकऱ्यांना दिले होते. या घटनेनंतर काही महिने मोटार पंप बंद करण्यात आले होते. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात हमखास ड्रेनेजमध्ये मोटारपंप टाकून उपसा करण्याचे काम शेतकरी करतात.