औरंगाबाद : क्रांतीचौक उड्डाणपुलाखालून विनापासिंगच्या मोपेडवरून जात असताना पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका नगरसेवकाविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली घडली.कचरूघोडके असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, घोडके हे विना पासिंगच्या मोपेडवरून राँगसाईडने क्रांतीचौक उड्डाणपुलाखालून जात होते. त्यावेळी वाहतूक शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र्र पारधी, हेड कॉन्स्टेबल श्रीराम बदने यांनी त्यांना अडविले. गाडीची कागदपत्रे दाखवा आणि राँगसाईडने का जात आहात, असा सवाल त्यांनी घोडके यांना केला. त्यावेळी मला ओळखत नाहीत का, मी नगरसेवक आहे, असे म्हणून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पोलिसांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात घोडकेविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक ए. के. मुदिराज यांनी दिली.
पोलिसांशी हुज्जत; नगरसेवकाविरोधात गुन्हा
By admin | Published: August 11, 2015 12:38 AM