छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत मागील तीन दशकांपासून कर्मचारी भरतीच झाली नाही. मागील दोन वर्षांपासून कर्मचारी भरतीचे वारे वाहू लागले. पहिल्या टप्प्यात ११४ कर्मचारी भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात २७४ पदे भरायची आहेत. त्यासाठी सध्या आचारसंहितेचे निमित्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता कोणत्या प्रवर्गाला किती आरक्षण द्यायचे, याचे रोस्टरच ठरलेले नाही.
महापालिकेत सध्या जिकडे तिकडे निवृत्त अधिकारी, कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी पाहायला मिळत आहेत. निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणतेही अधिकार देता येत नाही, हा शासनाचाच नियम असतानाही बहुतांश अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करून ठेवण्यात आले. त्यामुळे प्रशासनावर याचा नंतर ठपका ठेवला जाणार हे निश्चित. २०१७-१८ मध्ये कर्मचारी भरतीचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला. त्यानंतर सुधारित आकृतीबंधही शासनाने मंजूर करून दिला. भरतीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्या टप्प्यात ११४ पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यात २९ पदे अग्निशमन विभागाची होती. २९ पैकी नऊ उमेदवार अग्निशमन विभागात रुजू झाले. उर्वरित ८५ पदांपैकी ७० पदांवर उमेदवार रुजू झाले आहेत, पंधरा पदांवर उमेदवार रुजू होणे बाकी आहे.
दुसरा टप्प्यात २७४ पदेदुसऱ्या टप्प्यात २७४ पदांसाठी भरती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला. त्याला देखील शासनाने मान्यता दिली. शासनाने नियुक्त केलेल्या आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेऊन ही पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पदांचे रोस्टर (आरक्षण निहाय) ठरवणे गरजेचे होते, रोस्टर ठरवून त्याला विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग शाखेची मान्यता मिळाल्यावर जाहिरात प्रक्रिया करून पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार होते. मराठा आरक्षणाबद्दल शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यानंतर लागू झालेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे पदांचे रोस्टर ठरविण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.