औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही केंद्रांवर रोजच्या नियोजनापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत आहे. एका केंद्रावर १०० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे नियोजन असताना, प्रत्यक्षात लसीकरण दोनशे जणांना होत आहे. त्यामुळे पहिला डोस १५ फेब्रुवारीपूर्वी संपविण्यासाठी ही घाई होत आहे का, प्रत्येक आरोग्य कर्मचारी अर्धा तास निगराणीत थांबत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी १६ जानेवारी रोजी को-विन अॅप डाऊनलोड होऊ शकले नाही. त्यामुळे ऑफलाइन प्रक्रिया करण्यात आली, परंतु त्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच लसीकरणाची प्रक्रिया करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार, प्रत्येक केंद्रांवर १०० जणांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. शहरातील एका मोठ्या रुग्णालयातील केंद्रावरच रोज ३०० जणांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. उर्वरित ठिकाणी १०० कर्मचाऱ्यांना डोस देण्याचे नियोजन आहे, परंतु यातील काही केंद्रांवर त्यापेक्षा अधिक लसीकरण होत असल्याची परिस्थिती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमाेर आहे. त्यातूनच नियोजनापेक्षा अधिक लोकांना लस देण्यात येत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका दिवसातील स्थिती२७ जानेवारी रोजी १०० जणांचे नियोजन असलेल्या क्रांतिचौक अंतर्गत केंद्रावर १३५ जणांचे लसीकरण झाले, तर अन्य एका केंद्रावर २०१ जणांना डोस देण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर म्हणाल्या, लसीकरणाच्या पोर्टलवर नोंदणी केलेले आरोग्य कर्मचारी आले नाही, तर इतर कर्मचाऱ्यांना लस देता येत आहेत. त्यासाठी आता ऑन द स्पॉट अॅलोकेशनला मंजुरी मिळाली आहे.
नवीन सुविधाचार दिवसांपूर्वी ‘अॅड बेनिफिशरी’ अशी सुविधा (ऑप्शन) मिळाली आहे. नियोजनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील दिवसांतील कर्मचाऱ्यांनाही डोस देणे शक्य झाले आहे. कर्मचारी तयार असेल, तर त्यांना लवकर लस देता येत आहे. प्रत्येक कर्मचारी अर्धा तास निगराणीत थांबतात.- डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी