औरंगाबाद : माहेरातील एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीला माहेरी जाण्यास परवानगी देत नव्हता. त्यामुळे पत्नीच्या आईने मुलीला माहेरी का पाठवीत नाही, असा जाब विचारत जावयाला नोकरीच्या ठिकाणी जाऊन बेदम मारहाण केली. घरी आल्यावर घडलेल्या घटनेची माहिती सांगितल्यानंतर पत्नीसोबत भांडण झाले. या छळाला कंटाळून पतीने शुक्रवारी रात्री दहा वाजता आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पत्नी व सासूविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गारखेडा परिसरातील भरतनगर येथील संजय भागाजी कांबळे (३२) यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता आत्महत्या केली. या प्रकारानंतर मयताची आई रत्ना भागाजी कांबळे यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मयताची पत्नी आणि सासूविरोधात मुलाचा छळ केल्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताच्या पत्नीचे माहेरातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. पत्नी माहेरी गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला भेटत असे. त्यासाठी सासू मुलीला मदत करीत असे. याची माहिती पतीला झाल्यानंतर त्याने पत्नीला माहेरी पाठविणे बंद केले. त्यामुळे सासू व पत्नी सतत त्याला त्रास देत होत्या. मयत कामगार चौकातील रिलायबल कटन टेस्टिंग या ठिकाणी कामाला होता. नोकरीच्या ठिकाणी कामाला असतानाच सासूने त्याठिकाणी येत माझ्या मुलीला माहेरी का पाठवीत नाहीस, असे म्हणत बेदम मारहाण केली. घरी आल्यानंतर मयताने घडलेला प्रकार आई व पत्नीस सांगितला. तेव्हा पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोंखे, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निसार शेख अधिक तपास करीत आहेत.
चौकट
कामाच्या ठिकाणचा अपमान असह्य
अनैतिक संबंधाची माहिती झालेली असतानाही पत्नी सुधारेल या आशेने पती दिवस काढीत होता. मात्र, सासूने थेट नोकरी करीत असलेल्या ठिकाणी जाऊन जावयाला मारहाण केली. या प्रकारामुळे संजय कांबळे यास मानसिक धक्का बसला. घरी आल्यानंतरही पत्नी तिच्या आईचीच बाजू घेऊन भांडण करीत असल्यामुळे त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.