वैजापूर : शेतजमिनीच्या वादावरुन एका वृद्धाने मुलगा व नातवाच्या मदतीने पहिल्या पत्नीचा उपविभागीय अधिकारी कार्यालय रस्त्यावर चाकुने भोसकुन खुन केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी वैजापूर येथे घडली. न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
केसरबाई कारभारी गवळी (वय ७५,रा. भिंगी) असे मृताचे नाव असुन तिचा पती कारभारी किसन गवळी(८०), सावत्र मुलगा भरत कारभारी गवळी, नातु अतुल भरत गवळी (सर्व रा. घायगाव) व अन्य अनोळखी व्यक्ती यांनी खुन केल्याची फिर्याद मृताचा नातु किसन मुरलीधर तांबे यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी कारभारी किसन गवळी यास ताब्यात घेतले असुन अन्य आरोपी पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रमुख आरोपी कारभारी किसन गवळी याची घायगाव शिवारात शेतजमीन आहे. पहिली पत्नी केसरबाई यांच्यापासुन एक मुलगी झाल्यानंतर दिड वर्षात त्या माहेरी भिंगी येथे निघुन गेल्या होत्या.
जवळपास चाळीस वर्षांपासुन केसरबाई या भिंगी येथे राहत होत्या. कारभारी याने केसरबाई यांना सोडुन बिजलाबाई यांच्याशी दुसरा विवाह केला. केसरबाई यांचा पती कारभारी गवळी व सवत बिजलाबाई कारभारी गवळी यांच्यासोबत जमिनीचा वाद होता. त्यामुळे जमीन व पोटगी मिळवण्यासाठी वैजापूर न्यायालयात १९७२ पासुन दावा दाखल केला असुन त्यांचा वाद सुरु आहे. कारभारी गवळी याने पोटगीपोटी केसराबाई यांना चार एकर ३३ गुंठे जमीन दिलेली होती. परंतु, बिजलाबाई यांचा मुलगा भरत कारभारी गवळी व नातु अतुल भरत गवळी हे जमिनीचा ताबा देत नसल्यामुळे जमिनीचा ताबा मिळावा म्हणुन वैजापूर येथील न्यायालयात दावा सुरु होता. शनिवारी वैजापुरच्या दिवाणी न्यायालयातच ही घटना घडली.