औरंगाबाद: चुलत दिरासोबत असलेल्या अनैतिक सबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा बहिणीमार्फत दोन लाख रुपये सुपारी ददेऊन काटा काढल्याची घटना पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक येथे झाली. आरोपींनी सोमठाणा देविच्या डोंगरावर नेऊन खून केला आणि प्रेत थापटी तांडा शिवारात फेकून दिल्याचे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी मृताची पत्नी, मेहुणीसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.
अशोक बाबासाहेब जाधव(रा.कडेठाण बु.) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नी रंजना अशोक जाधव , मेहुणी मिनाबाई मंसाराम पठाडे(४०, रा.करंजगाव), संतोष सारंगधर पवार(४०), कारभारी उर्फ बापू एकनाथ घोलप (२५,रा. बदनापूर), अरुण शिवाजी नागरे (३५,रा. अकोला निकळक, ता. बदनापूर), प्रभाकर उर्फ शाम भिवसन तांबे (रा.अकोला निकळक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे म्हणाले की, रंजना हिचे तिचा चुलत दिर रामप्रसाद उर्फ बाळू शिवाजी जाधव सोबत अनैतिक सबंध होते. त्यांच्या दोघांत मोबाईलवर झालेल्या संवादाची रेकॉर्डिंग अशोक यांनी ऐकली. यामुळे पती पत्नीत महिनाभरापूर्वी भांडण झाले होते. पती भांडल्याचा राग रंजना हिला आला होता. यामुळे तिने तिची बहीण मिनाबाई हिला अशोकचा काटा काढ त्यासाठी तुला शेतमाल आणि दागिने विकून दोन लाख रुपये देते असे सांगितले.
यानंतर मिना हिने गावातील संतोष पवार याला अशोकला मारण्याची सुपारी दिली. १७ हजार रुपये आगाऊ रक्कम दिली. यानंतर त्यांनी कट रचल्यानुसार मिनाबाईने अशोकला फोन करून करंजगाव येथे १९ मे रोजी बोलावून घेतले. त्यांच्यातही अनेक वर्षापासून अनैतिक सबंध असल्यामुळे अशोक तिच्या घरी आला. ठरल्याप्रमाणे मिना ही अशोकला घेऊन सोमठाणा देवीच्या डोंगरावर गेली. तेथे संतोष हा त्याचे साथीदार घोलप, नागरे आणि तांबे यांच्यासह हजर होते. तेथे भांडण करून आरोपींनी अशोकला गळा आवळून मारून टाकले. यानंतर अशोकच्याच दुचाकीवरुन संतोषने मिनाबाईला गावात नेऊन सोडले. त्यानंतर ती दुचाकी एका ठिकाणी रस्त्यावर टाकून दिली. दरम्यान, अन्य आरोपींनी कारमधून मयत अशोकचे प्रेत थापटी शिवारातील रस्त्यालगत बेवारस अवस्थेत टाकून दिले. दुसऱ्या दिवशी हे प्रेत आढळून आल्यावर अशोकचा मुलगा ज्ञानेश्वर यांनी पाचोड ठाण्यात खूनाची तक्रार नोंदविली. स्थानिक गुन्हे शाखेला या प्रेताविषयी माहिती मिळताच त्यांनी तपास करून अवघ्या २४ तासांत आरोपीना अटक केली