औरंगाबाद, दि. ५ : संशयाचे भूत डोक्यात घुसलेल्या एका माथेफिरूने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिचा खून केला. नंतर त्याने फरशी कापण्याच्या कटरने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यास उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही खळबळजनक घटना बुधवारी रात्री मयुरपार्क परिसरातील मारोतीनगरात घडली. कल्पना हरिओमदास बैनाडे (वय २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर हरिओमदास गोविंददास बैनाडे(३५) असे खूनी पतीचे नाव आहे.
याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हरिओमदास बैनाडे हा फरशी बसविण्याचे काम करतो. तर त्याची पत्नी काही दिवसापूर्वी एका खाजगी रुग्णालयात कामाचा शोध घेत होती. या दाम्पत्याला मुलगी नितल(वय ११), ममता(वय ९) आणि मयुरेश(वय ५) अशी अपत्य आहे.२००४ साली कल्पना आणि हरिओमदास यांचा विवाह झाला. हरिओम हा संशयी स्वभाचा होता. तो सतत कल्पना हिच्या चारित्र्यावर संशय घेत. त्याच्या या त्रासाची माहिती माहेरी आणि सासरच्या मंडळींनाही अनेकदा दिली. मात्र त्याच्याकडून त्रास कमी होत नसल्याने चार महिन्यापूर्वी कल्पना माहेरी मयुरपार्क येथे मुलगा आणि दोन मुलींसह निघून गेली आणि तिने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी हरिओमदासला ठाण्यात बोलावून त्यास समज दिली होती.
तेव्हा त्याने यापुढे कल्पनाला त्रास देणार नाही,असे पोलिसांना लिहून दिले होते. तेव्हा हे दाम्पत्या मुकुंदवाडी परिसरात राहात होते. मात्र त्याच्याकडून त्रास कमी होणार नाही,अशी खात्री कल्पनाला असल्याने त्याने त्याच्यासोबत नांदायला जाण्यास नकार दिला होता. तेव्हा त्याने कल्पनासह तिचे भाऊ आणि आई यांच्यासमोर झालेल्या चुकांबद्दल माफी मागितली. त्यानंतर मुकुंदवाडी परिसरात न राहता कल्पनाच्या आईआणि भावाशेजारीच घर भाड्याने घेऊन राहण्याची तयारी त्याने दाखविली.
यानंतर दोन महिन्यापासून ते मयुरपार्क परिसरातील मारोतीनगरात राहू लागले. आठ दिवस चांगले वागविल्यानंतर हरिओमदासकडून पुन्हा कल्पनाच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरवात झाली आणि तो तिला सतत त्रास देऊ लागला. बुधवारी कल्पना कामाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. रात्री तो कामावरून आल्यानंतर त्याला ही बाब खटकली आणि त्याने पुन्हा कल्पनासोबत भांडण सुरू केले. या भांडणामुळे कल्पनाने रात्री स्वयंपाक केलाच नाही. यामुळे संपूर्ण कुटुंब उपाशीपोटीच झोपले. रात्री दोन वाजेच्या सुमारास हरिओमने झोपलेल्या कल्पनाच्या डोक्यात होतोड्याने जोराचा प्रहार केला. यात ती ठार झाली.