कन्नड तालुक्यातील वासडी येथील शिक्षक शामराव दगडू घुगे यांची मुलगी धनश्री हिचा विवाह फुलंब्री येथील जगदीश भास्कर नागरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी घर बांधण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत सासरची मंडळी छळ करीत होत; परंतु तिची समजूत घालून तिला सासरी पाठविण्यात आले. नवऱ्याने मारले, घरातल्यांचा त्रास नकोसा झाला आहे. पप्पांना अर्जंट मला घ्यायला पाठवा, असा फोन धनश्रीने केला होता. नवरा म्हणतो की, तू मला आवडत नाहीस. घरच्यांमुळे मी तुझ्याशी लग्न केले. तू मला नको आहेस, मरून जा, असे धनश्रीने बहीण पायल हिला सांगितले होते. यानंतर तत्काळ घाटी दवाखान्यात येण्याबाबत शामराव यांना त्यांचे नातेवाईक गणेश ताठे यांचा फोन आला. ते घाटीत पोहोचले तेव्हा धनश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांना कळले.
शामराव घुगे यांनी फिर्याद दिली. यावरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील शरद बांगर यांनी आणि फिर्यादी शामराव घुगे यांच्यावतीने अॅड. सचिन चव्हाण यांनी बाजू मांडली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना धनश्रीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल भादंवि कलम ४९८( अ ) नुसार प्रत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड आणि तिच्या आत्महत्त्येस कारणीभूत झाल्याबद्दल प्रत्येकी ७ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला.