औरंगाबाद : इन्स्टाग्रामवर ओळख झालेला प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीचा खून करून, पाचोड हद्दीतील हर्षी शिवारात मृतदेह जाळणाऱ्या मारेकऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या ७२ तासांत पकडले. घटनास्थळावर काही अंतरावर आढळलेल्या पाणी बाटली आणि कॅरीबॅगमुळे पोलिसांना मृताची ओळख पटविल्यानंतर, आरोपींपर्यंत पोहोचता आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देविदास रामभाऊ जाधव (४२, रा.शेवगाव) असे मृताचे नाव आहे. मृताची दुसरी पत्नी सुरेखा देविदास जाधव (रा.जाधव वस्ती, शेवगाव, जि.अहमदनगर), प्रियकर आशिष विजय राऊत (२६) आणि संगीत शामराव देवकते (२५, दोघे रा.सावळी, ता.आर्णी, जि.यवतमाळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक म्हणाले की, १८ मे रोजी हर्षी शिवारात अर्धनग्न जळालेला मृतदेह आढळला होता. काही अंतरावर पाण्याची बाटली आणि कॅरीबॅग होती. मृताची ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळले. पाचोड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड ठाण्याची मिळून चार पथके तपास करीत होती.
घटनास्थळावरील कॅरीबॅग शेवगाव येथील दुकानाची असल्याने पोलिसांनी दुकानदाराची भेट घेतली. त्याने २०१७ सालीच या कॅरीबॅग देणे बंद केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या वर्षातील त्याच्या दुकानातील बिल बुकची तपासणी करून, ग्राहकांची नावे आणि मोबाइल नंबर मिळविले. मृताचे छायाचित्र आणि वर्णनाची माहिती समाजमाध्यमावर प्रसारित केली. तेव्हा दुसऱ्या दिवशी मृताच्या एका नातेवाइकाने सुरेखा जाधव आणि तिचा पती गायब असल्याची माहिती दिली. सुरेखा ही जाधवची दुसरी पत्नी होती. पहिली पत्नी त्याला सोडून जुन्नर (पुणे) येथे विवाहित मुलीसह राहत असल्याने, पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला. तिला मृतदेह दाखविल्यानंतर तिने हा मृतदेह पती देविदासचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सुरेखाच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा ती आशिषच्या संपर्कात असल्याचे व दोघेही नागपूरला असल्याचे समजले. पोलिसांनी नागपुरातून त्यांना उचलले, तेव्हा त्यांच्याजवळ १ लाख ५१ हजार रुपयांची रोकड आढळली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. खून करताना संगीत सोबत होता आणि त्याच्याच कारमधून शिवारात शव जाळल्याचे सांगितले. पोलिसांनी संगीतलाही अटक केली.
इन्स्टाग्रामवर मैत्री आणि प्रेमसंबंधआशिष व सुरेखात इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या अधूनमधून भेटीगाठी होत. दरम्यान, पती त्रास देतो, तो प्रेमसंबंधातील अडसर असल्याचे तिने सांगितले. यानंतर, त्यांनी देविदासचा काटा काढला.
यांनी केला तपासपोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे, पाचोडचे सपोनि. गणेश सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे, कर्मचारी श्रीमंत भालेराव, बाळू पाथ्रीकर, वाल्मिक निकम, रजनी सोनवणे, आनंद घाटेश्वर, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी हा तपास केला.