लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी रात्री जितेंद्र नारायण होळकर या बँक अधिकाºयाचा झालेल्या खुनाचा छडा लावण्यात शहर गुन्हे शाखा पोलिसांना २४ तासांत यश आले. चारित्र्यावर संशय घेऊन पती उठता-बसता शिवीगाळ करून अपमान करीत असल्याच्या रागातून पत्नीनेच २ लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी होळकर यांच्या पत्नीसह सुपारी देणारा मध्यस्थ आणि दोन मारेकºयांना अटक केली.मृताची पत्नी तथा मुख्य आरोपी भाग्यश्री जितेंद्र होळकर (३८, रा. छत्रपतीनगर), मध्यस्थ शिवसेना कार्यकर्ता किरण काशीनाथ गणोरे (रा. नारळीबाग), मारेकरी शेख तौसिफ शेख इब्राहिम (२६, रा. जुनाबाजार) आणि शेख हुसेन ऊर्फ बाबू शेख बशीर (२६, रा.आजीम कॉलनी, जुनाबाजार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे आणि उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन खुनाचे गूढ उकलले. ते म्हणाले, जितेंद्र होळकर हे पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून पती-पत्नीत सतत भांडण होई. बºयाचदा मुलगा आणि मुलींसमोर पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत पानउतारा करतो, याचा तिला प्रचंड राग येई. ही बाब ती ओळखीचा शिवसेना कार्यकर्ता किरण गणोरे यास सांगायची आणि या त्रासातून मुक्त करण्यासाठी काहीतरी कर, अशी विनंती त्यास करायची. किरणने तिला मदत करण्याची तयारी दर्शविली. या कामासाठी दोन-तीन महिन्यांपूर्वी तिने त्यास दहा हजार रुपयेही दिले होते. तेव्हापासून ती सतत किरणला भेटून कामाचे काय झाले, असे विचारत होती. किरण हा सुपारी किलरच्या शोधात असताना त्याची भेट बेरोजगार तौसिफसोबत झाली. तौसिफला त्याने एका महिलेची तिच्या पतीच्या त्रासातून मुक्तता करायची असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने सुपारी घेतली. मात्र, त्याने ही बाब भाग्यश्रीच्या तोंडून ऐकल्यानंतरच हे काम करीन, असे तो किरणला म्हणाला. किरणने घटनेच्या चार दिवस आधी भाग्यश्रीला जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर बोलावून तौसिफची भेट करून दिली. तेथे भाग्यश्रीने आरोपीला जितेंद्रपासून सुटका करा, तुम्हाला २ लाख रुपये देईन, असे सांगितले. त्यानंतर तिने अॅडव्हान्स म्हणून आरोपींना देण्यासाठी किरणला १० हजार रुपये दिले. खुनानंतर उर्वरित १ लाख ९० हजार देण्याचे ठरले होते.स्पोर्टस् बाईकची मदतगुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात आणि निरीक्षक मधुकर सावंत यांनी खबºयाचे चांगले नेटवर्क तयार केले आहे. खबºयांचे नेटवर्क हेच गुन्हे शाखेच्या आजच्या यशाचे गमक आहे.आरोपींनी गुन्ह्यात स्पोर्टस् बाईक वापरल्याचे छत्रपतीनगरातील सीसीटीव्हीत दिसले होते. आरोपी तौसिफ हा रात्री १० नंतर कधीही घराबाहेर पडत नाही. शुक्रवारी रात्री तो ११.३० च्या सुमारास स्पोर्टस् बाईकवरून तो बाहेर गेला आणि रात्री ३ च्या सुमारास घरी आला. त्यानंतर सकाळपर्यंत त्याच्या घरासमोर ही दुचाकी उभी होती. ही माहिती खबºयाने पोलिसांना दिली. चौकशीअंती तौसिफ आणि किरण हे चार ते पाच दिवसांपूर्वी होळकरच्या घरी गेले होते, अशी माहिती मिळाली. यामुळे संशयावरून पोलिसांनी गणोरेला त्याच्या घरातून रात्री उचलले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया किरणने गुन्ह्याची कबुली देऊन या खुनात आरोपी तौसिफ आणि भाग्यश्री यांच्यात मध्यस्थ असल्याचे सांगितले. भाग्यश्रीनेच सुपारी देऊन ही हत्या केल्याचे सांगितले.
पत्नीनेच सुपारी देऊन काढला पतीचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:11 AM