औरंगाबाद : आजारी पत्नीवर उपचार करण्यासाठी पतीने परिसरात लावलेल्या चारचाकी गाड्यांच्या बॅटऱ्या, व्हिल कॅप, एलईडी, डीव्हीडी एलई, जॅकची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.
मुकुंदवाडी ठाण्यात विष्णू तवार यांनी ३१ जुलै रोजी चारचाकी गाडीतील बटऱ्या, व्हिल कॅप, एलईडी, डीव्हीडीसह इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविल्यानंतर निरीक्षक गिरी यांना एक व्यक्ती चारचाकी गाड्याच्या सामानाची विक्री करण्यासाठी मुकुंदवाडीतील रामनगरमध्ये आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, मनोहर गिते, संतोष भानुसे, अनिल थोरे, गणेश वाघ आणि श्याम आढे यांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाठविले. एक व्यक्ती रामनगर परिसरात गाडीची व्हिल कॅप, जॅक घेऊन फिरत असल्याचे दिसली. तेव्हा त्यास हटकल्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
अरुण यशवंतराव कुंटे (४०, रा. राजनगर, मुकुंदवाडी), असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर त्याने आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्यामुळे गाड्यांमधील साहित्य चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख १ हजार ८०० रुपयांचे चारचाकी गाडीतून चोरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केल्याची माहिती निरीक्षक गिरी यांनी दिली. अधिक तपास हवालदार दिगंबर धारबळे करीत आहेत.