औरंगाबाद : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना मंगळवारी एक भावूक क्षण अनुभवावा लागला.प्रसंग होता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभ उभारणीचा... यावेळी आयुष्यभर आरोग्यसेवेची उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टर मंडळींना जीवन गौरव पुरस्काराने देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. इंदूप्रकाश गजभिये यांचे या पुरस्कारासाठी नाव पुकारण्यात आले. तेव्हा त्यांच्या पत्नी डॉ. मीनाक्षी गजभिये या व्यासपीठावर आल्या. त्यांच्या काखेत एक गाठोडे होते. डॉ. गजभिये यांना हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते हयात होते. १० जूनला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिनी जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार होते. परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलावा लागला. मंगळवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. इंदूप्रकाश गजभिये यांचा सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नी डॉ. मीनाक्षी यांनी स्वीकारावा अशी त्यांना विद्यापीठातर्फे विनंती करण्यात आली होती.
डॉ. मीनाक्षी गजभिये या सध्या कोल्हापूरहून बदली झाल्याने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून नुकत्याच रुजू झाल्या आहेत. आजच्या समारंभात अमित देशमुख यांनी जीवनगौरव पुरस्काराचा विद्यापीठाचा स्कार्फ, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देताना डॉ. मीनाक्षी त्यांना म्हणाल्या, स्कार्फ या गाठोड्यावर घाला. यात मी डॉ. इंदुप्रकाश गजभिये यांच्या अस्थी आणलेल्या आहेत.हे ऐकूण मंत्री देशमुख हे भावूक झाले. त्यांनी तसेच केले. पण हे कोणालाच काही कळले नाही. अध्यक्षीय समारोप करताना देशमुख यांनीच ही गोष्ट सांगितली. ''शासन म्हणून तुमची काळजी घेणे आणि तुम्हाला तुमच्या सोयीनुसार सेवेची संधी उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. '' अशा स्पष्ट शब्दात व टाळ्यांच्या गजरात देशमुख यांनी डॉ. मीनाक्षी गजभिये यांना आश्वस्त केले.
डॉ. अरुण महाले, डॉ. शरद कोकाटे, डॉ. ज्ञानेश्वर मुखेडकर, वैद्य रमेश गांगल, डॉ. अरुण भस्मे यांना यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विभागीय केंद्रासाठी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डॉ. विलास वांगीकर यांचा सत्कार करण्यात आला.