औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने १०० बसेस खरेदी केल्या आहेत. मागील वर्षभरापासून या बसेसवर जोरदार चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी शंभरमधील पहिली बस शहरात दाखल झाली. अंधश्रद्धेत बुडालेल्या मनपा पदाधिकाऱ्यांनी दुपारी १२.४० वाजता अमावास्या संपल्यावर १.०० वाजता स्मार्ट सिटीचे मेंटॉर तथा गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या हस्ते विधीवत बसचे पूजन करण्यात आले. २३ डिसेंबरला बससेवेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी योजनेत मागील तीन वर्षांपासून निधी पडून होता. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सर्वप्रथम शहर बसला शासनाकडून मंजुरी आणली. त्यानंतर लगेच निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ३६ कोटी रुपये महापालिका या स्तुत्य उपक्रमावर खर्च करीत आहे. टाटा कंपनीने बस पुरवठा करण्याचे कंत्राट मिळविले. मागील तीन महिन्यांपासून मनपाच्या डिझाईननुसार बस बांधणीचे काम कर्नाटकातील धारवाड येथे सुरू होते. दोन दिवसांपूर्वी बसेस तयार झाल्या.
पहिली बस शुक्रवारी दुपारी शहरात दाखल झाली. महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी चातकाप्रमाणे बसची वाट पाहत होते. अमावास्येची वेळ संपल्यावर बस डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आणण्यात आली. त्यानंतर मेंटॉर सुनील पोरवाल यांच्या हस्ते बसचे विधीवत पूजन करण्यात आले. कंपनीने बस फुगे लावून सजविण्यात आली होती.
यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, सभागृह नेते विकास जैन, विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, सभापती माधुरी अदवंत यांच्यासह स्मार्ट सिटी संचालक मंडळातील सदस्य तथा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, भास्कर मुंढे, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची उपस्थिती होती. पूजा झाल्यानंतर आयुक्तांनी बस विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना नेऊन दाखविली. टाटा कंपनी डिसेंबर अखेरपर्यंत पन्नासहून अधिक बसेस मनपाला देणार आहे. जानेवारीअखेरपर्यंत आणखी ५० बसेस दाखल होतील.
३६ लाखांची एक बसस्मार्ट सिटी योजनेतील ही बस अत्याधुनिक असावी असा मनपाचा भर होता. तब्बल ३६ लाख रुपये एका बसवर खर्च करण्यात आले आहेत. एकूण ३६ कोटी रुपये १०० बस खरेदीत खर्च होणार आहेत.
स्मार्ट बसमधील वैशिष्ट्ये- बसमधील आसनव्यवस्था टू बाय टू आहे. प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत. या तुटण्याची शक्यता आहे. - बसमध्ये आग लागल्यास तूर्त दोन अग्निरोधक सिलिंडर ठेवली आहेत.- प्रवाशांसाठी कोणता थांबा आला, हे सांगण्यासाठी अनाऊन्समेंट सिस्टिम.- बसमधील ३२ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आहे.- बसला चढण्या-उतरण्यासाठी दोन दार, एक आपत्कालीन दार आहे.- बसमध्ये उभ्या प्रवाशांच्या लोखंडी दांड्यावर एक पॅनिक बटन आहे.- आपत्कालीन सूचना देण्यासाठी बसमध्ये एक लाल दिवा बसविला.- आपत्कालीन परिस्थितीत काच फोडून बाहेर पडण्यासाठी एक हॅमर बसविला आहे.- प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल डिस्प्ले बोर्ड बसविला आहे.