पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीने सायंकाळी बुधवारी ४ वाजेच्या दरम्यान १४९५.०१ फुटांची पातळी ओलांडताच जायकवाडीचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. २२ मार्चपासून मृतसाठ्यात असलेले धरण जिवंत साठ्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जायकवाडी धरणात सायंकाळी चार वाजता १.०५% जलसाठा झाला होता. धरणात ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने जलसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत नाशिक ३७ मि.मी., त्र्यंबकेश्वर ७९ मि.मी., इगतपुरी १३४ मि.मी., घोटी ९७ मि.मी., गंगापूर १०६ मि.मी., कश्यपी ५१ मि.मी., कडवा ४६ मि.मी., दारणा ७० मि.मी., भावली १२७ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याने तेथील धरण समूहातील बहुतेक धरणांनी प्रचलन आराखड्यातील पाणीपातळी ओलांडल्याने त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, सोडलेले पाणी जायकवाडीला प्राप्त होत आहे.
बुधवारी (दि.३१) दुपारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून ५३१० क्युसेक, दारणा धरणातून १३०५८ क्युसेक, पालखेड धरणातून १५२२ क्युसेक, कडवा धरणातून ७०५६ क्युसेक विसर्ग सुरू होता. या सर्व धरणाचा एकत्रित विसर्ग नांदूर-मधमेश्वर वेअरमधून ४६९८३ क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीनदीला गत चार दिवसांपासून आलेला पूर कायम असून जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. २२ मार्च रोजी धरणाची पाणीपातळी १४९४.५० फुटांपेक्षा खाली गेल्याने धरण मृतसाठ्यात गेले होते. २२ मार्च ते ३१ जुलैदरम्यान चार महिने औरंगाबाद, जालना, पाथर्डी, शेवगाव आदींसह शेकडो गावांची तहान मृतसाठ्यातून भागविली गेली. जवळपास २३८ द.ल.घ.मी. (८.४२ टी.एम.सी.) पाण्याचा वापर मृतसाठ्यातून करण्यात आला.दरम्यान, बुधवारी रात्री ८ वाजता धरणाची पाणीपातळी १४९५.०१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा ७६०.९४९ द.ल.घ.मी. (२६ टी.एम.सी.) झाला असून, यापैकी २२.७४३ द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे. १ जून २०१९ पासून धरणात २३८.४९६ द.ल.घ.मी.ची आवक झाली आहे.
जलविद्युत प्रकल्प सुरू होणारधरण जिवंत साठ्यात आल्याने १ आॅगस्टपासून धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पाणीपातळी मृतसाठ्यात गेल्याने मार्च महिन्यापासून बंद असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे टर्बाईन उद्या सकाळी ९ वा. पुन्हा फिरणार आहेत. जलविद्युत निर्मितीनंतर गोदावरीत पाणी सुटत असल्याने कुणीही गोदावरी नदीपात्रात उतरू नये, जनावरे, वाहने किंवा कोणतीही मालमत्ता नदीपात्रात राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे .