छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिलपर्यंत मागील २५ वर्षांपासून दगडी पाटा-वरवंटा विक्रेत्यांनी अतिक्रमण करून छोट्या-छोट्या झोपड्या बांधल्या होत्या. महापालिकेने यापूर्वी सहा वेळेस या झोपड्या हटविल्या होत्या. बुधवारी मोठ्या ताकदीने महापालिकेने सर्व झोपड्यांवर सातव्यांदा कारवाई केली. हा शेवटचा वरवंटा होता. यापुढे झोपड्या अजिबात दिसणार नाहीत, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला. दिवसभरात एकूण २५ जणांवर कारवाई केली.
खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने पोलिसांच्या मदतीने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे. सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी २४ तास वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागते. महापालिकेने यापूर्वी अनेकदा कारवाई केली. दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण होत होते. काही महिन्यांपूर्वी दसऱ्याला कारवाई करण्याचा मनपाने प्रयत्न केला होता.
अतिक्रमणधारकांनी काही दिवस थांबा, अशी विनंती केली होती. स्वत:हून अतिक्रमणे न काढल्याने बुधवारी कारवाई करण्यात आली. १७ झोपड्यांमध्ये पाटा-वरवंटा विक्रीचा व्यवसाय सुरू होता. ५ जणांना फुलझाडे विक्रीची दुकाने सुरू केली होती. अन्य तीन जणांनी छोटी अतिक्रमणे केली होती. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक संदीप राठोड यांच्या सहकार्याने वॉर्ड अधिकारी प्रसाद देशपांडे, निरीक्षक सय्यद जमशेद आदींनी केली.