वाळूज महानगर : वळण घेणाऱ्या मालवाहू ट्रकला वाळू वाहतूक करणाºया भरधाव हायवाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात हायवा चालक जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी वाळूज लगत जिकठाण फाट्याजवळ घडली.
वाळूने भरलेला हायवा (एमएच-२०, सीटी-१९१) रविवारी गंगापूरकडून वाळूजच्या दिशेने भरधाव येत होता. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान जिकठाण कडून सिमेंटचे पाईप घेवून येणारा ट्रक (एमएच-२०, ईजी-२३४) औरंगाबाद-नगर महामार्गावर वळण घेत असताना हायवाने ट्रकला जोराची धडक दिली.
यात हायवा चालक (नाव समजू शकले नाही) गंभीर जखमी झाला असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अखेर वाळूज व वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.