औरंगाबाद: शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासारखी महापालिकेत व इतर कुठेही मी लुडबूड करीत नाही. मी खासदार आहे, त्यामुळे कोणती कामे कशी करायची याची मला जाण असल्याचा टोला खा. डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी लगावला.
एन-४ सी सेक्टरमधील विसावा शिशू उद्यानाच्या सुशोभिकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. अतुल सावे, माजी आमदार सुभाष झांबड, शिवेसना विधानसभा संघटक राजू वैद्य, अनिल भालेराव, मनोज बोरा, लायन्स क्लबचे एन. आर.वर्मा, ओमप्रकाश अग्रवाल, रहिवासी अर्जुन चव्हाण, वामन दाणेकर, भाऊसाहेब जगताप आदींची उपस्थिती होती.
खा. कराड म्हणाले, एन-३, एन-४ या वॉर्डात भाजपाने अनेक कामे केली आहेत. त्यामुळे येथील समस्याची मला जाण आहे. नागरिकांनी जी कामे निवेदनाद्वारे मागणी केली आहेत, ती पूर्ण करण्यात येतील. आ. सावे म्हणाले, या उद्यानात कै. मोरेश्वर सावे यांच्या हस्ते चार दशकांपूर्वी वृक्षारोपण झाले होते. त्या रोपांचे आता वटवृक्ष झाले आहे. या वॉर्डांत जी कामे झाली, त्यात माझाही सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. उद्यानात कै. गंगाराम जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २ हजार लिटरची पाण्याची टाकी बसविण्यात आली.
शिवसेनेचे प्रत्युत्तर असेशिवसेना विधानसभा संघटक राजू वैद्य यांनीही खा. कराड यांच्या टोलेबाजीला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, लुडबूड करण्याचा काहीही मुद्दा नाही. लोकांची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावेच लागेल. यात लुडबूडचा प्रश्न येतच नसल्याचे सांगून त्यांना कराड यांना रोखण्याचा प्रयत्न केला.