वाळूज महानगर (औरंगाबाद) : रस्त्यात गाडी उभा करून गप्पा मारणाऱ्यास पुढे जाण्यास सांगताच एकाने वाळूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी सायंकाळी नगर महामार्गावर घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल पांडुरंग गबाळे हे शनिवार (दि. २२) सांयकाळी साडेसातच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावर कर्तव्य बजावत होते. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाल्यामुळे ते वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत होते. वाळूजच्या कमळापूर फाट्यावर कारचालक बबलू पठाण हे रस्त्यावर सय्यद समीर (रा. लिंबेजळगाव) याच्या बोलत असताना वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे गबाळे यांनी कारचालक पठाण यांना कार पुढे घेण्यास सांगितले. यावेळी चालकासोबत गप्पा मारणाऱ्या समीर सय्यद याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
समीर सय्यद याने कॉन्स्टेबल गबाळे यांना, ‘तुला काय करायचे ते कर, तू मला ओळखत नाही का, मी लिंबेजळगावचा उपसरपंच आहे,’ असे म्हणत कॉलर पकडून शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्याने त्यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी समीर सय्यद याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके हे करीत आहेत.