औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातर्फे करोडी येथे ‘आय अॅण्ड सी’ सेंटर (इन्स्पेक्शन आणि सर्टीफिकेशन) उभारण्यात येणार आहे. स्वयंचलित यंत्रणा राहणाऱ्या या सेंटरद्वारे वाहन तपासणी अधिकाधिक अचूक होईल. याबरोबर नव्या वर्षात करोडीत अत्याधुनिक ट्रॅकची उभारणी करून लासन्सची चाचणी घेतली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी सांगितले.
औरंगाबादेतील आरटीओ कार्यालयाची सध्याची इमारत अत्यंत जुनी झाली आहे. त्यामुले शहराजवळील करोडी येथील ११ एकर जागा देण्यात आली. या ठिकाणी आरटीओ कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी २१.९४ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. जागेवर संरक्षक भिंत, ब्रेक चाचणी ट्रॅक आणि इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही कामे प्रगतिपथावर असून लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. याठिकाणी जड व इतर वाहनांची फिटनेस चाचणी घेतली जात आहे. यासाठी येथे ब्रेक चाचणी ट्रॅकही तयार केला आहेत.
नव्या वर्षात करोडीत आता पर्मनंट लायन्ससची चाचणी सुरु करण्याची तयारी आरटीओ कार्यालयातर्फे सुरु आहे. त्यासाठी आवश्यक असलेला टेस्टींग ट्रॅकचे डिझाईन तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. ‘सीआयआरटी’ या संस्थेतर्फे डिझाईन तयार करण्यात येत आहे. संगणकीय प्रणालीवर आधारित अत्याधुनिक असा हा ट्रॅक राहणार आहे. आरटीओ कार्यालयात केवळ लर्निंग लायन्ससचे काम होईल. त्याबरोबर वाहनांची फिटनेस तपासणी अधिक पारदर्शकपणे होण्यासाठी ‘आय अॅण्ड सी’ सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यातून अधिक चांगल्याप्रकारे वाहन तपासणी होईल,असे सतीश सदामते यांनी सांगितले.
‘आय अॅण्ड सी’ सेंटरची सुविधाया सेंटरमध्ये रोलर ब्रेक टेस्ट, पीयूसी तपासणी, वाहनांच्या खालील भागाची तपासणी करणारी यंत्रणा, स्टेअरिंग कनेक्शन यंत्रणा आदी राहणार आहे. आजघडीला फिटनेस तपासणीदरम्यान मोटार निरीक्षकांकडून तपासणी केली जाते. या सेंटरमुळे अधिक पारदर्शक तपासणी करणारी यंत्रणा उभी राहील. त्यामुळे वाहनांत काही दोष असल्यास तात्काळ निदान होण्यास मदत होईल.
असा राहणार अत्याधुनिक ट्रॅकइंग्रजीतील आठ आकडा आणि एच या अक्षराचा ट्रॅक राहणार आहे. एच आकाराच्या ट्रॅकवर चारचाकी वाहन मागे -पुढे घेण्याची चाचणी घेतली जाईल. या ट्रॅकखाली सेंसर राहतील. त्यामुळे लायन्ससाठी चाचणी घेताना काही चुक झाली तर आपोआप त्यांची संगणकीय नोंद घेतली जाईल. त्यामुळे अप्रशिक्षित चालकांना लायन्सस देण्याच्या प्रकारावर आळा बसेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.