सिल्लोड ( औरंगाबाद ) : नागरी सत्कारमुळे मी भारावून गेलो आहे. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही. यामुळे मी आमदार, खासदार, मंत्री होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, कार्यकर्त्यांचे व मतदारांचे प्रेम, आशीर्वादामुळे मी इथपर्यंत मजल मारली, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर सिल्लोड शहरात रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांचा बुधवारी नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
पुढे बोलताना दानवे म्हणाले, सिल्लोड-भोकरदनला रेल्वेमंत्रिपद मिळाले त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. या मंत्रालयाचा व्याप मोठा असल्याने मला पहिल्यासारखे मतदारसंघात फिरता येणार नाहीत. त्यामुळे मतदारांनी कार्यकर्त्यांनी आपाआपली गावे सांभाळावी भाजपाचे विचार आणि कार्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावे.
यावेळी व्यासपीठावर मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश बनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, माजी सभापती अशोक गरुड, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, माजी चेअरमन श्रीरंग साळवे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जैस्वाल, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, विनोद मंडलेचा यांची प्रमुख उपस्थिती होती. तर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप दाणेकर, माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत, सरला बनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पुष्पाताई काळे, पंचायत समिती सदस्य अनिल खरात, गणेश बनकर, विलास पाटील, किरण पवार, मनोज मोरेल्लू, विनोद मंडलेचा, विजय वानखेडे, किशोर गवळे, मधुकर राऊत यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने हजर होते.