औरंगाबाद : दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या योजनांवर आपला विश्वास नाही, यामुळे या ३०-३० घोटाळ्यांशी आपला संबंध नाही. मी पैसेवाला माणूस नाही, माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो, असा खुलासा ३०-३० घोटाळ्यांत नाव आल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. वर्षभरापूर्वी पोलिसांचा आपल्याला याप्रकरणात फोन आला होता. तेव्हा त्या अधिकाऱ्यांना, माझ्या घरी यावे अथवा मी तुमच्याकडे येतो, असे सांगितले होते, यानंतर पोलिस माझ्याकडे आले नाहीत आणि मी त्यांच्याकडे गेलो, असेही त्यांनी नमूद केले.
औरंगाबादेतील कोट्यवधींच्या ३०-३० घोटाळ्यात विरोधी पक्षनेते आ. दानवे यांचे नाव असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमावर सोमवारी झळकल्या. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माझी सांपत्तिक स्थिती सर्वांना माहिती आहे. माझे स्वत:चे घर नाही, मी आजही वडिलांच्या घरात राहतो. दोनपट, चारपट परतावा देणाऱ्या फसव्या योजनांवर माझा विश्वास नाही. यामुळे अशा योजनांमध्ये पैसे गुंतविण्याचा प्रश्नच नाही.
या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार संतोष राठोड यास तुम्ही ओळखता का, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखतो, असे सांगितले. ३०-३० घोटाळ्यांचे प्रकरण संपले आहे. याप्रकरणात आपल्याला वर्षभरापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला होता. राठोडकडून जप्त केलेल्या डायरीत गुंतवणूकदारांच्या नावांच्या यादीत आपले नाव असल्याचे आणि त्यासमोर एक आकडा असल्याचे समजले होते. तेव्हा त्या पोलिस अधिकाऱ्यांना काही माहिती हवी असेल, तर माझ्या घरी या अथवा मी तुमच्या कार्यालयात येतो, असे सांगितले होते. यानंतर ते अधिकारी माझ्याकडे आले नाहीत आणि मीही त्यांच्याकडे गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तुमच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात दानवे म्हणाले की, जो जास्त बोलतो, त्याला ‘ईडी’ची कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न होतो, असे आपण पाहातो आहोत.