औरंगाबाद : येथील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या जाचाला कंटाळून त्यांची भावजय जयश्री बोरनारे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.
वैजापुरातील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे व त्यांच्या कुटुंबीयांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी एका कार्यक्रमात भावजय जयश्री बोरनारे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी जयश्री बोरनारे यांच्या तक्रारीवरून आ. बोरनारे व त्यांच्या कुटुंबीयांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून आमदार रमेश बोरनारे व त्यांचे कुटुंबीय जयश्री बोरनारे व त्यांच्या पतीचा छळ करीत आहेत. त्यांच्या घरावर रात्री-बेरात्री दगडफेक करण्यात येते. आमदार बोरनारे यांच्या सांगण्यावरून ग्रामस्थ व नातेवाईक आमच्यावर बहिष्कार टाकत आहेत. त्यांना कोणत्याही घरगुती कार्यक्रमाला बोलावू नका, अशी तंबी आमदार बोरनारे नातेवाईकांना देतात. त्यामुळे जयश्री बोरनारे यांचे कुटुंबीय पूर्णपणे हताश झाले आहे.
अन्नपाणी गोड लागेना, जगणे नकोसे झालेआम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही. अपमानास्पद भावना आमच्यात निर्माण झाली आहे. आमदार बोरनारे यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आता जगणे नकोसे झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. आमदार बोरनारे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी दबावाखाली थातूरमातूर कारवाई केली. त्यामुळे आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आत्महत्येची परवानगी मागितली आहे. यास आमदार रमेश बोरनारे, संजय बोरनारे, दिनेश बोरनारे, रणजित चव्हाण व पोलीस यंत्रणा जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.