छत्रपती संभाजीनगर : आंदोलनस्थळी पोलिसांना चहा, पाणी देऊन मी पाहुणचार केला. सर्व काही शांततेत सुरू होते. मात्र, अचानक लाठीमार झाला. माझ्यासह सर्व कुटुंबीय जखमी झाले. मात्र, जखमी झालेले असतानाही मी दोन गरोदर महिला पोलिसांना वाचविले, अशी आपबीती अंतरवाली सराटीतील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदाेलनस्थळी झालेल्या लाठीहल्ल्यातील जखमी निर्मला तारख यांनी कथन केली.
अंतरवाली सराटीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून निर्मला तारख, त्यांचे पती विजय, सासू अलकाबाई व मुलगा असे सर्व जण आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात निर्मला तारख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, नाकाचे हाड मोडले आहे. त्यासोबत सासू व पतीदेखील जखमी आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरक्षण आमच्या हक्काचे
त्या म्हणाल्या, आंदोलनस्थळी भजन, कीर्तन होत होते. अचानक लाठीमार झाला. माझ्या डोक्यात १५ टाके पडले आहेत. माझ्या पतीवर, मुलावर, सासूवरही लाठीमार झाला. आंदोलन सुरू झाल्यापासून पोलिसांची ये-जा सुरू होती. त्यांना मी चहा, पाणी केले. त्याच पोलिसांनी माझ्यावर पहिला लाठीहल्ला केला. दोन गरोदर पोलिस कर्मचाऱ्यांना घरात आश्रय दिला, गंभीर जखमी असताना रुग्णवाहिकादेखील मिळाली नाही, दीडशे ते दोनशे लोक उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. आरक्षण आमच्या हक्काचे आहे, असे निर्मला तारख यांनी सांगितले.