चापानेर : टाकळी लव्हाळी ते जवळी या पाच किलोमीटर रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून वाट लागली आहे. या चिखलमय रस्त्याने कुठलेही वाहन जात नसल्याने आहेर वस्तीवरील कडुबा भाऊसाहेब आहेर यांना उपचारासाठी चक्क तीन किलोमीटर खाटेवर झोपवून घेऊन जावे लागले. या रस्त्यासाठी गावकऱ्यांनी शासन दरबारी बराच पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधीकडेही कैफियत मांडली; मात्र अद्यापपर्यंत कोणीही त्याची दखल घेतली नसल्याने या भागातील नागरिकांना रस्त्याअभावी नरक यातना भोगाव्या लागत आहेत.
टाकळीचे राहिवासी कडुबा आहेर हे शेतवस्तीवर राहतात. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असून, त्यांची अचानक तब्येत खराब झाल्याने त्यांना उपचारासाठी कन्नडला घेऊन जायचे होते; परंतु पूर्ण रस्ता चिखलमय असल्यामुळे त्यांच्या घरापर्यंत वाहन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे गावातील उपसरपंच सुदाम आहेर, मेघराज गिरी, ज्ञानेश्वर आहेर, सुभम बारगळ, अक्षय कुदळे, अमोल बारगळ, सचिन बारगळ, श्रीकांत वाकळे यांनी त्यांना खाटेवर झोपवून तब्बल तीन किलोमीटर अंतर पायी खांद्यावर आणत कन्नडला पुढील उपचारासाठी दाखल केले. पावसाळ्यात या रस्त्यावर अनेक वाहने चिखलात फसत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतवस्तीवरील शाळकरी मुलांसाठी शिक्षणासाठी या रस्त्यावर पायपीट करावी लागते.
------- रस्त्यासाठी पाठपुरावा ------
कन्नड तालुक्यातील टाकळी लव्हाळी ते जवळी या पाच किलोमीटर रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला. यासह विविध लोकप्रतिनिधींकडेसुद्धा नागरिकांना आपली कैफियद मांडली; परंतु आजपर्यंत संबंधित रस्त्याचे काम झाले नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----- छायाचित्र
140921\img-20210913-wa0103_1.jpg