औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज नाहीत, असे मी हात जोडून सांगतो. विनंती आहे, जशी बातमी आहे, तशीच द्या, असे कळकळीचे आर्जव भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सोमवारी येथे केली. एका ठिकाणी शिक्षक परिषदेला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर विभागात संदीप जोशी, अमरावती नितीन धांडे, पुणे विभाग संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिल्याचे आ. पाटील यांनी घोषित केले.
बोराळकर यांच्या उमेदवारीमुळे बंडखोरीची शक्यता आहे. बीडचे माजी जिल्हाप्रमुख रमेश पोफळे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, या प्रश्नाच्या उत्तरात आ. पाटील म्हणाले, राजकारण असो किंवा घर आमदनी दहा, खर्च वीस रुपये असतो. पाटील म्हणाले घराघरांत नाराजी असते, न्यायाची व्याख्या म्हणजे, एकाला न्याय बाकीच्यांवर अन्याय असेच असते. प्रवीण घुगे यांना उमेदवारी न दिल्याने पंकजा या काही नाराज नाहीत. त्यांच्या घरी चहापान झाले. त्या कारखान्याच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्या आज आल्या नाहीत. त्यांचा एसएमएस देखील आला.