औरंगाबाद : औरंगाबादकरांची उर्दू भाषेची जाण व त्यांचे शायरीवरील उत्कट प्रेम पाहून प्रख्यात शायर राहत इंदौरी यांनी येथील एका मुशायऱ्यात त्यांच्या विशेष अंदाजात ‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद को सलाम करता हूँ...’ असा संवाद साधताच, उपस्थित हजारो रसिकजनांनी त्यांना ‘जनाब, बहोत खुब’ म्हणत टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
देशाचे जानेमाने शायर राहत इंदौरी यांच्या निधनाचे वृत्त शहरात धडकले अन् त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या औरंगाबाद भेटीच्या आठवणी अनेकांनी जागविल्या. मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. सिद्दीकी झकियोद्दीन ऊर्फ मशू हे सचिव असलेल्या उम्मीद कल्चरल फाऊंडेशनने ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने २६ जानेवारी २०१८ रोजी अखिल भारतीय स्तरावरील मुशायरा शहरात आयोजित केला होता. लोकमत वृत्तपत्र समूह या मुशायऱ्याचा मीडिया पार्टनर होता. मौलाना आझाद महाविद्यालयालगतच्या नवल टाटा स्टेडियममध्ये हा मुशायरा पार पडला होता. प्रा. मशू म्हणाले, देशभरातून १५ नामचीन शायर या मुशायऱ्यात सहभागी झाले होते; परंतु राहत इंदौरी यांना मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता.
शायरांनी पेश केलेल्या प्रत्येक शेरला कुठे प्रतिसाद द्यावा, कशी दाद द्यावी, कुठे नको, याची औरंगाबादकरांची जाण पाहूण राहत इंदौरी भारावून गेले होते. तेव्हा त्यांनी शायरीच्या दिवाण्या औरंगाबादकरांना उद्देशून ‘पुरे हिंदुस्थान में औरंगाबाद को सलाम करता हूँ...’ असे उद्गार काढले होते. या मुशायऱ्यात शिरकत केलेल्या मान्यवरांचे स्वागत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, फाऊंडेशनचे अध्यक्ष मंजूर खान यांनी केले होते. यासह अनेक आठवणी प्रा. मशू यांनी सांगितल्या. सात महिन्यांपूर्वीच ११ जानेवारीला राहत इंदौरी औरंगाबादेत आले होते. कौमी एकतेवरील एक सुरेख संदेश यावेळी मुशायऱ्यातून त्यांनी दिला होता. त्यांना मंचावर शायरीसाठी निमंत्रित करताच औरंगाबादकरांनी उभे राहून टाळ्यांचा मोठा गजर केला होता. तेव्हा या सन्मानाला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘बीमार हूँ. बेकार नहीं. आधी सदी से एक तिहाई दुनिया में मैं शायरी सुना रहा हूँ, लेकीन ऐसी कामयाबी नहीं देखी. त्यानंतर आपल्या विशेष अंदाजात त्यांनी, ‘अपना आवारा सर झुकाने को तेरी दहलिज देख लेता हूँ,और फिर कुछ दिखाई दे न देकाम की चीज देख लेता हूँ...’ पुढे ते म्हणतात, ‘तेरी परछाई मेरे घर से नहीं जाती है, तू कही हो मेरे अंदर से नहीं जाती है, आसमां मैंने तुझे सर पे उठा रखा है, ये है तोहमत जो मेरे सर से नहीं जाती है,
दु:ख तो ये है कि अभी अपनी सफहें तिरछी है,ये खराबी मेरे लश्कर से नहीं जाती है...’ हा शेर त्यांनी पेश केला होता. याला जोडत ते पुढे सादर करतात...
‘मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, लहूसे मेरी पेशानी पर हिंदुस्थान लिख देना,
उठा शमशीर, दिखा अपना हुनर, क्या लेगा,ये रही जान, ये गर्दन है, ये सर है, क्या लेगा,
सिर्फ एक शेर उड़ा देगा परखच्चे तेरे, तू समझता है कि शायर है ये, कर क्या लेगा...’या आशयगर्भ; परंतु विद्यमान स्थितीवर प्रखर भाष्य करणारी शायरी त्यांनी सादर केली होती.
2009 मध्येही राहत इंदौरी एका मुशायऱ्यानिमित्त शहरात आले तेव्हा लोकमतला त्यांनी विशेष मुलाखत दिली होती. यासह अन्य एक-दोन वेळा औरंगाबादेत आलेल्या राहत इंदौरी यांचा औरंगाबादकरांवर विशेष लोभ होता.