घाटनांद्रा : लग्न म्हणजे भव्य समारंभ नव्हे, तर दोन मनांचा, दोन कुटुंबांचा, दोन संस्कारांचा होणारा संगम होय; मात्र आता लग्नाच्या या धामधुमीत वधू मंडळीकडून केल्या जाणाऱ्या अजब अटींमुळे वरपित्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
बदललेली परिस्थिती व सुधारणांमुळे लग्न करताना मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिणामी, शेतकरी मुलांचे लग्न करताना अनंत अडचणी येत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी मुलांचे बाशिंग जड झालेले आहे. पूर्वी शेती प्रथमस्थानी व नोकरी, व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जात असे. त्यामुळे शेती व्यवसाय करणाऱ्या मुलाचे लग्न होण्यास फारशी अडचण येत नव्हती; पण जसजसा काळ बदलत गेला. तसतशी लग्नाची परिभाषा बदलत गेली आहे. मुली शिक्षण घेऊन मोठ्या झाल्यात. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या वेळप्रसंगी सगळ्याच क्षेत्रात आपली अनोखी छाप त्या पाडत आहेत. त्यामुळे जोडीदाराबाबत त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.
नोकरी, शेती आणि चांगले घर असेल तर त्या मुलाच्या लग्नात अडचणी कमी येतात; पण ग्रामीण भागात आज अनेक युवक शेती करीत आहे. वडिलोपार्जित शेती करून चांगले उत्पन्न मिळवीत असतानादेखील शेतकरी मुलाला नकार घंटाच ऐकायला मिळत आहे. आजकाल मुली शिकून नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदारही नोकरी करणारा असावा, अशी त्यांची अपेक्षा वाढली आहे. नोकरीवाला नवरा पाहिजे, त्यातही त्याला सरकारी नोकरी पाहिजे. या भुमिकांमुळे शेतकरी मुलांची मात्र फार अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.