औरंगाबाद : दुबई वारी करून शहरात आलेल्या तरुणाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले होते. या रुग्णावर चिकलठाणा येथे महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. १४ दिवसांनंतर रुग्णाला घरी सोडावे, अशी केंद्र शासनाची नियमावली असताना हा तरुण मला कुठलाही त्रास नाही, त्यामुळे सुटी हवी म्हणजे हवीच, असा हट्ट धरून बसला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पेचात सापडले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत निर्देश मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे.
शहरात ओमायक्रॉन विषाणूचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी या दोघांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील एकजण औरंगाबादमधील मूळ रहिवासी व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यांची मुलगी मुंबईतच पॉझिटिव्ह आली होती, तर वडील औरंगाबादला आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुसरा रुग्ण सिडको एन-७ येथील रहिवासी आहे. तो दुबईहून शहरात १७ डिसेंबरला शहरात आला. त्याचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्याचा दहावा दिवस होता. पण गेल्या दोन दिवसांपासून तो सुटीसाठी प्रशासनावर प्रचंड दबाव आणत आहे. कुठलीही तीव्र लक्षणे नसताना हॉस्पिटलमध्ये ठेवताच कशाला? मी घरी विलगीकरणात राहतो, असे सांगून त्याने डॉक्टरांना भंडावून सोडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेने यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाला अधिक तपशील पाठवून दिला. त्याचप्रमाणे केंद्रालाही रिपोर्ट करण्यात आला.
तरुण ‘ओमायक्राॅन’मुक्तदरम्यान, दुबईहून शहरात परतल्यानंतर ओमायक्राॅनबाधित आढळलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा सोमवारी रात्री कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या तरुणाला बुधवारी मेल्ट्राॅनमधून सुटी देण्यात येणार असून, ७ दिवस होम क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी दिली.