सिल्लोड: 'मी नाराज नाही. मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांना खाते बदलण्याची नागपूर अधिवेशनात विनंती केली होती. ती विनंती त्यांनी मान्य केली. आता अल्पसंख्यांक खात्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. यात चांगलं काम करेल', अशी ग्वाही नवनियुक्त अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजित पवार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांना देखील मंत्रीपद देण्यात आले. यामुळे शिंदे- फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांच्या खात्यात बदल झाला आहे. यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे देखील खाते बदल झाला. त्यांना आता अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या बदलानंतर मंत्री सत्तार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कृषीमंत्री असतांना आम्ही शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. अतिवृष्टीची नुकसान भरपाई पोटी बारा हजार कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे आम्ही शेतकरी बांधवांना दिले आहेत. सूर्यफूल आणि कापूस यासाठी एक हजार कोटीची तरतूद केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. बळीराजाच्या मदतीसाठी कृषी विभागाची लोक सोळा हजार गावापर्यंत गेले. मंत्रिमंडळातल्या सर्व विभागातील मंत्र्यांनी मला या काळामध्ये मदत केल्याचेही सत्तार म्हणाले.
सर्वात वेगवान सरकारशेतकरी राजावर जेंव्हा अस्मानी संकट येते तेव्हा कृषी विभागाची सर्वात मोठी भूमिका असते. मागील वर्षांमध्ये मला वाटत नाही की एवढे वेगवान निर्णय घेणारे सरकार आतापर्यंत कोणाचे असेल.
धनंजय मुंडे कर्तव्यदक्षधनंजय मुंडे तरुण आहेत. काम करण्यामध्ये सक्षम आहेत. माझ्या संकल्पना मी राबवल्या, त्यांच्या संकल्पना ते राबवतील. कर्तव्यदक्ष आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून धनंजय मुंडे यांचे मोठे नाव आहे.
माझ्या कामावर समाधानीमी अजित दादाला विनंती करेल की अल्पसंख्याक समाजासाठी जास्त निधी द्यावा. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री मला मदत करतील अशी अपेक्षा आहे. मी अनेक खात्याच्या जबाबदाऱ्या आतापर्यंत पार पाडल्या. ग्रामविकास, महसूल, कृषी, संवर्धन व दोनदा राज्यमंत्री राहिलोय. योगायोगाने एका अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यात मी समाधानी आहे, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.