सोयगाव : मी काम करतो म्हणून जनतेला मते मागतो. ही विरोधक मंडळी जातीधर्माच्या नावावर मते मागतात. हिंमत असेल तर त्यांनी विकासाच्या नावाखाली मते मागावीत, असे खुले आवाहन महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी उद्धवसेनेला दिले. मी पुन्हा विजयी होणार असून पुन्हा जिल्ह्याचा पालकमंत्री होणार आहे. तसा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत दिला आहे, असेही सत्तार म्हणाले.
सोयगाव येथे रविवारी दुपारी २ वाजता आयोजित प्रचार सभेत बोलताना शिंदेसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री पदावर बसविले; परंतु दोन वर्षे ते मंत्रालयात खुर्चीवर बसलेच नाहीत. त्यामुळेच त्यांची खुर्ची काढून घेत त्यांना आम्ही आपटले. एक भाजपाचा (भोकरदनचा) नेता मला औरंगजेब म्हणतो, दुसरीकडे छत्रपती शिवराय यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. हीच तुमची संस्कृती आहे का? असा थेट सवाल त्यांनी रावसाहेब दानवे यांना भर सभेत विचारला.
या सभेस नगराध्यक्ष आशाबी तडवी, समाधान तायडे, श्रीराम चौधरी, तालुका प्रमुख प्रभाकर काळे, सुरेखा तायडे, सुशिला इंगळे, धृपताबाई सोनवणे, उत्तम गवळे, विष्णू वाघ, बंडू काळे, योगेश पाटील, धरम सिंग चव्हाण, विनोद मंडलेचा, जितसिंग करकोटक, समाधान थोरात, विमलबाई खैरनार, गयाबाई सावळे, दारासिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.