औरंगाबाद : आगामी लोकसभानिवडणूक मी औरंगाबादलोकसभा मतदारसंघातून लढवणारच आहे. त्याची तयारी मी सुरू केली आहे. मला कोणीही मॅनेज करू शकणार नाही, असे कन्नडचे आमदार व शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
औरंगाबाद शहरातील कचरा समस्येवर उपायांवर आमदार जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढावण्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले. तसेच मला कोणीही मॅनेज करू शकणार नाही, आतापर्यंत विविध पक्षांच्या उमेदवारांना मॅनेज करून किंवा आपल्या सोयीचा उमेदवार द्यायला लावून चंद्रकांत खैरे निवडणुका जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. यावेळी पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार आहे. अगदी माझे सासरे रावसाहेब दानवे यांनाही मॅनेज करून खैरे निवडणूक जिंकत गेले, अशी टीकासुद्धा त्यांनी यावेळी केली.
संभाव्य उमेदावारांबद्द्ल बोलताना ते म्हणाले, यावेळी काँग्रेसतर्फे सुभाष झांबड हे लोकसभा उमेदवार असतील तर तेही खैरेंचेच उमेदवार आहेत, असे माझे म्हणणे आहे. काहीही करून आपली निवडणूक सोपी करून घ्यायची, हे खैरेंचे तंत्र राहत आले. आता मी उभा राहणार म्हटल्यानंतर खैरे सतर्क झाले आहेत. आतापर्यंत खैरेंशिवाय पर्यायच कुठे आहे, असे लोकांना वाटायचे. आता मी माझ्या रूपाने पर्याय देऊन पाहणार आहे.