लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आज मी औरंगाबादेतील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. खा. चंद्रकांत खैरे आणि लच्छू पहिलवान यांनीच दंगल भडकावली, अशी तक्रार नागरिकांनी माझ्याकडे केली. मात्र, या दोघांनाही हात लावायला पोलीस अद्याप तयार नाहीत. या दोघांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. शिवाय मी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे की, चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे तिकीट देऊ नका. खैरेंची प्रतिमा बिघडली आहे. हा माणूस दंगली भडकवत फिरतोय, अशी तक्रार मी ठाकरे यांच्याकडे करणार आहे.’ असे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले....हे तर भाजपला आव्हानदलवाई म्हणाले की, हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करूनच दाखवा, असे आव्हान खा. खैरे देत आहेत. हे भाजपला आव्हान आहे. कारण गृहखाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे आहे. काँग्रेसचे सरकार असते, तर आतापर्यंत खैरेंना अटक झाली असती. कायद्यासमोर गुंड असो की पुंड, सारे सारखेच असतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असते; परंतु औरंगाबादचे पोलीस शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागत आहेत. ते जर कायद्याचे पालन करू शकत नसतील, तर त्यांनी खाकी वर्दी उतरवून ठेवली पाहिजे. लच्छू पहिलवान गेल्या सहा महिन्यांपासून वातावरण बिघडवत होता. तो हप्तेखोरी करीत होता. त्याच्यावर तेव्हाच कारवाई झाली असती, तर कदाचित दंगल घडली नसती. आताही पोलीस जर लच्छू पहिलवानवर कारवाई करीत नसतील, तर या हप्तेखोरीत पोलिसांचा हात असावा, अशी शंका घ्यावी लागेल.‘जय श्रीराम’ची घोषणाऔरंगाबादची दंगल ही भाजप व शिवसेना यांच्यातील आपसातील सत्ता संघर्षावरून घडली आहे. पोलिसांची त्यांना साथ मिळालेली आहे. पोलिसांच्या गोळीबारात हरीस हा मुलगा दगावला, असे सांगत असले तरी त्याला पोलिसांनी मारून टाकले आहे, असा आमचा आरोप आहे. घरात त्याचे प्रेत पडलेले असताना पोलीस पुन्हा त्याच्याच घरी जाऊन कोम्बिंग आॅपरेशन करतात. त्यावेळी वर्दीतले पोलीस ‘जय श्रीराम’ची घोषणा देतात आणि विशिष्ट समाजाला अर्वाच्य शिवीगाळ करतात, हे फार भयानक आहे, अशी जळजळीत प्रतिक्रियाही दलवाई यांनी दिली.एमआयएम हा पक्ष नव्हे. हा काही सेक्युलर फोर्स नाही. त्यामुळे जो-जो जातीयवादी आहे, त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू, असेही दलवाई यांनी स्पष्ट केले व येथील खासदार लच्छू पहिलवानच्या पातळीला का जातात? असा सवाल करून आश्चर्य व्यक्तकेले.यावेळी युसूफ अन्सारी, डॉ. पवन डोंगरे, मुद्दसर अन्सारी, आबेदा आपा, पंकजा माने आदींची उपस्थिती होती.