लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात समस्या भरपूर आहेत. या समस्यांचे निरसन हळूहळू येणाºया अडीच वर्षांमध्ये प्राधान्याने करण्यात येईल. शहर बस, स्मार्ट सिटी, पाणी प्रश्न, कचरा, रस्त्यांच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या संकल्प पुस्तिकेत दिला आहे.शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक उभारण्यासाठी एमजीएम परिसरात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने या उपक्रमासाठी ५ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यावर भर देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकास कामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुमारे २७० कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. या निधीत विकास कामांना सुरुवात करण्यात येईल. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी २०१८ रोजी जन्म दिन असून, याच दिवशी शहर बस सेवा सुरू करण्याचा मानसही घोडेले यांनी व्यक्त केला आहे.शहरात कचºयाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, कचºयावर प्रक्रिया करणे, नारेगाव कचरा डेपो येथील कचरा नष्ट करणे आदी महत्त्वाची कामे आहेत. शहरात दोन वेळेस साफसफाई व्हावी या दृष्टीनेही पाऊल उचलण्यात येईल. शहरातील पर्यटन स्थळे, प्रमुख रस्ते, महापुरुषांच्या पुतळ्यांचा परिसर सुशोभीत ठेवण्यावर भर दिला जाईल. शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी दिला आहे. ५० कोटी मनपा खर्च करून १५० कोटींचे रस्ते लवकरच तयार होतील यावरही भर देणार आहोत, असे त्यांनी नमूद केले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मोठी जलवाहिनी टाकण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.मनपाचा कारभार पारदर्शक, गतिमान करणार त्याचप्रमाणे शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. भूमिगत गटार योजना, सातारा-देवळाईचा विकास, गुंठेवारी वसाहतींमध्ये विकास कामे, महिलांसाठी स्वच्छतागृह, सफारी पार्कची उभारणी आदी अनेक कामांना प्राधान्य देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
शहराचा सर्वांगीण विकास करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:08 AM