पैठण (औरंगाबाद) : पैठणच्या अधोगतीस आमदार -खासदारांना मी जबाबदार धरणार नाही; तर अशा निष्क्रिय लोकांना वारंवार तुम्ही निवडून देता म्हणून यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, अशा मुर्दाड लोकांचे नेतृत्व मी करणार नाही, अशा शब्दांत पैठण शहर व तालुक्याची झालेली दुरवस्था पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरे १९ जुलैपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. पैठणची दुरवस्था पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही का, असा थेट सवाल ठाकरे यांनी पैठणकरांना विचारला. तुम्हाला वाटत नसेल पण मला लाज वाटते. गेल्या सात-वर्षांपूर्वी मी पैठण शहरात आलो होतो, तेव्हा जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे, शहरात दोन-चार नव्या इमारती व्यतिरिक्त काहीच बदल झाल्याचे दिसत नाही, असे का, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे म्हणाले की, तुम्हाला तर आजचा दिवस कसा जाईल, या पलीकडे विचार करण्याची कुवतच नसल्याने असे घडते. अशा मुर्दाड लोकांचे नेतृत्व मला करायचे नाही. तुम्हाला जर तुमच्या शहरासाठी, तालुक्यासाठी काही करायचे असेल तर मला भेटा. मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे, नाही तर कृष्ण-कुंजवर तुम्ही कधीही भेटू शकता, असे निमंत्रणही त्यांनी उपस्थित युवकांना दिले.
जायकवाडी धरणाला भेटराज ठाकरे यांनी जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयास भेट दिली. या प्रसंगी त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे आदी उपस्थित होते.