छत्रपती संभाजीनगर : जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या पत्नी तथा जालना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आपल्या मुलाला अंगणवाडीत दाखल करून अधिकाऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला, याची चर्चा ताजी असतानाच गुरुवारी विकास मीना यांनी वैजापूर तालुक्यातील विविध अंगणवाड्यांना अचानक भेटी देऊन तेथे बालकांना दिला जाणारा षोषक आहार व शालेय पूर्व शिक्षणाचा आढावा घेतला.
ग्रामीण भागात शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रांद्वारे दर्जेदार सेवा पुरविल्या जातात का, याचा आढावा मुख्यालयात बसून न घेता मागील काही दिवसांपासून ‘सीईओ’ मीना हे अचानकपणे संबंधित कार्यालयांना भेटी देऊन खातरजमा करतात. गुरुवारी त्यांनी वैजापूर तालुक्यातील रोटेगाव, आघुर, खंडाळा व शिऊर या चार ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेबाबत थेट लाभार्थ्यांशी संवाद साधला. घरकुल बांधकामासाठी येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. एवढेच नाही, तर ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत भेटी देऊन गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. शिऊरमध्ये त्यांनी ग्रामपंचायतीत जाऊन योजनांची माहिती जाणून घेतली. आरोग्य केंद्रात जाऊन औषधींचा साठा तपासला.
यावेळी संबंधित गावांचे ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक, लाभार्थी, गटविकास अधिकारी हनुमंत बोयनर, विस्तार अधिकारी मंगेश कुंटे, बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विरगावकर, कनिष्ठ अभियंता शंकर चव्हाण, पंतप्रधान घरकुल योजनेचे कर्मचारी, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, सुनील पैठणपगारे, रोटेगावच्या सरपंच अनिता शिंदे, उपसरपंच धिरज राजपूत, आघूरचे सरपंच रावसाहेब मतसागर, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे तालुका समन्वयक सतीश रहाणे, विशाल लाठे उपस्थित होते.
मुलांसोबत साधला संवादआघून जि.प. प्राथमिक शाळेतील पाचवीच्या वर्गात मुलांसोबत संवाद साधला. मुलांना इंग्रजी शब्द लिहिणे, वाचणे, बोलणे येते का, याची चाचपणी केली. त्यानंतर त्या शाळेत स्वत: हाताने खिचडी घेऊन मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची चव चाखली. त्यांच्या या भेटीमुळे तालुक्यातील शिक्षक, वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी, ग्रामसेवकांची मात्र, चांगलीच धांदल उडाली.