औरंगाबाद : ४ आक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घोषणा केलेल्या ‘इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी’ संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी (दि.४) जालन्याजवळील शिरसवाडी येथे झाले. मात्र, याचवेळी घोषणा केलेल्या जालना, लातूर येथील पॉलिटेक्निकचे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर, स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर संस्थांच्या निर्मितीसाठी अद्यापही कार्यवाही झालेली नाही. तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला बांधकामासाठी एकही रुपया मिळालेला नाही. हा निधी देण्याची मागणी मराठवाड्यातील नागरिक करीत आहेत.
मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्राचा असलेला मागासपणा दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक संस्था सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, यातील ‘आयसीटी’ या संस्थेच्या उपकेंद्रासाठीच ३९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत संस्था कार्यान्वित केली. याचे उद््घाटन आज सकाळी ११.३० वाजता झाले. उर्वरित घोषणांमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला १५० कोटी रुपयांपैकी एकही रुपया देण्यात आलेला नाही.
विधी विद्यापीठाचा निधी कधी मिळणार तसेच मागील वर्षी सुरू झालेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या जागेचा, बांधकाम सुरू करण्याचा प्रश्न अद्यापही सोडविण्यात आलेला आहे. या विद्यापीठासाठी २३२ कोटी रुपयांचा बांधकाम प्लॅन राज्य सरकारला सादर केलेला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
महाविद्यालयांची मंजुरी प्रलंबित याचवेळी याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना व लातूर जिल्ह्यात दोन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. त्यापैकी प्रत्येकी एका महाविद्यालयाची श्रेणी बदलून त्याचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी केवळ लातूरच्या पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव ‘एआयसीटी’कडे दाखल झालेला आहे. त्यावरही कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे सर्व प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. मराठवाड्यासाठी घोषित झालेल्या या संस्थांना निधी आणि मंजुरी देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
‘स्पा’ची घोषणा हवेतचमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०१७ रोजी विधि विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ (स्पा) संस्थेची उभारणी लवकरच औरंगाबादेत होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारने कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे समोर आले आहे.